मुंबई : जयपूर येथे महागाई विरोधात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भाजपच्या हिंदुत्वादाच्या मुद्यावर टीका केली. यावेळी त्यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादामधील फरक सांगितला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’कधी काळी देशात मुसलमान , दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे. भाजप त्याचेच ‘खात’ आहे. अशा परिस्थितीत विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला आहे. गांधी हिंदू तर गोडसे हिंदुत्ववादी अशी फोड करून त्यांनी चर्चा सुरू केली. हिंदू म्हणजे सत्य व हिंदुत्व म्हणजे सत्ता असे ते म्हणाले,पण देश हिंदूंचा आहे हा विचार त्यांनी पुन्हा घासून पुसून वर आणला आहे. घासलेला हा दिवा त्यांना पेटविता आला तर स्वागतच आहे.’
भारत हा हिंदूंचा देश असल्याचे फटाके राहुल गांधी यांनी जयपूरच्या भूमीवर फोडले आहेत. जयपुरात काँग्रेसने महागाईविरोधात मोठा मेळावा घेतला. या मेळाव्यास सोनिया गांधी, राहुल व प्रियंका गांधी उपस्थित होत्या. गर्दीही चांगली होती. राजस्थानात गेल्या काही काळापासून राजकीय अस्थिरतेचे वारे वाहत होते. पंजाबनंतर राजस्थानातही बदल केले जातील असे चित्र होते. पण जयपूरच्या महागाईविरोधी रॅलीनंतर राजस्थानात मुख्यमंत्री बदल होईल असे दिसत नाही. संपूर्ण गांधी परिवार जयपुरात हजर झाला व २०२४ च्या प्रचाराची दिशा त्यांनी जयपुरातूनच ठरवली. राहुल गांधी यांनी महागाईचे खापर हिंदुत्वावर फोडले. गांधी म्हणतात,’हा हिंदूंचा देश आहे. हिंदुत्ववाद्यांचा नाही आणि आज या देशात महागाई असेल तर हे काम हिंदुत्ववाद्यांनी केले आहे. हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे. त्यांना सत्याशी काही देणेघेणे नाही. सन २०१४ पासून देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, हिंदूंचे नाही. आणि आपल्याला हिंदुत्ववाद्यांना घालवायचे आहे आणि पुन्हा हिंदू राजवट आणायची आहे’, असा महनीय विचार गांधींनी मांडला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’हिंदू आणि हिंदुत्व याबाबत त्यांनी शब्दच्छल केला आहे. तरीही देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाला साद घालण्याची भूमिका अनेक वर्षांनंतर काँग्रेसने घेतली. निधर्मीवाद म्हणजे फालतू सेक्युलरवादाच्या फंदात व छंदात अडकून पडलेल्या काँग्रेसला राहुल गांधींनी नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची आजची अवस्था गावातल्या जमीनदारी गेलेल्या पडक्या भग्न वाडय़ासारखी झाली असल्याचे विश्लेषण शरद पवारांसारख्या नेत्यांनी केले, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. मुस्लिम व दलित मतांची घसघशीत रोकडा पेढी हेच त्या जमीनदारीचे फळ होते. याच मुसलमान – दलितांच्या ‘रोकडा’मुळे काँग्रेसचा वाडा चिरेबंदी तसेच वैभवशाली वाटत होता. आज ही दोन्ही खणखणीत नाणी काँग्रेसच्या मुठीतून सुटली व उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, प. बंगालसारख्या मोठय़ा राज्यांतून काँग्रेसची घसरण झाली. मुंबई-महाराष्ट्रातला मुसलमान बिनधास्तपणे शिवसेनेला मतदान करतो. मुस्लिमांच्या मतांसाठी फालतू लांगूलचालन न करणाऱ्या शिवसेनेला मुस्लिम समाजाने आपले मानावे हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे’, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- तर तुमचा राग….; म्हाडा पेपरफुटी प्रकरणी राज ठाकरे आक्रमक
- सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती-चंद्रकांत खैरे
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज


