Share

Saamana | “महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे, बाकी..” सामना आग्रलेखातून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील राजकरणात सध्या खळबळजनक घडामोडी सुरु आहेत. वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यावर विरोधकांनी सत्ताधारकांवर सडकून टीका केली. त्यामुळे गुतरातला महाराष्ट्राचा दुश्मन ठरवलं जात असल्याचं यावेळी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अनेक आरोप केले आहेत. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवलं जात आहे, महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचं आव्हान फडणवीस यांच्या समोर असल्याचं यावेळी सामना मधून म्हटलं आहे.

महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत गुजरातच्या पुढे नेऊ, असे श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. गुजरात म्हणजे लहान भाऊ, पाकिस्तान नाही, असेही मोलाचे मार्गदर्शन श्री. फडणवीस यांनी केले. ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातून हिसकावून नेल्यापासून फडणवीस सरकार हे सगळय़ांच्याच टीकेचे लक्ष्य बनले आहे. शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री आहेत व त्यांचे चाळीस आमदारही मुख्यमंत्री म्हणूनच वावरत आहेत. त्या अराजकातून राज्य चालविण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर पडते. मुख्यमंत्री म्हणून शिंद्यांवर शिवसेना फोडण्याची, गणपती दर्शन, उत्सव मंडळे, पूजा, लग्न समारंभांना भेटी देण्याची जबाबदारी आहे. फडणवीसांवर राजशकट हाकण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘फॉक्सकॉन’ प्रकरणात फडणवीस काय म्हणतात याकडेच गांभीर्याने पाहिले जाते. फडणवीस यांची भूमिका संयमाची आहे, पण महाराष्ट्राची स्पर्धा गुजरातशी नाही. महाराष्ट्राचे गुजरातशी भांडण असण्याचे कारण नाही. तुम्ही गुजरातला लहान भाऊ मानता. शिवसेनेने गुजरातला नेहमीच जुळया भावाचा मान दिला. मुंबई हे जेव्हा द्विभाषिक राज्य होते तेव्हा गुजरात व महाराष्ट्र एकच होता. आपापल्या भाषिक राज्यांसाठी मराठी माणसांबरोबरच गुजराती बांधवांनाही मोरारजी देसाईंच्या अतिरेकी गोळीबारात हौतात्म्य पत्करावे लागले. महाराष्ट्र व गुजरातचा जन्म एकाच गर्भातून झाला. दोन्ही राज्ये व बांधव नेहमीच गुण्यागोविंदाने नांदले. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातचे नातेसंबंध काय ते फडणवीस यांनी सांगण्याची गरज नाही. गुजरात पाकिस्तान नाही हे तुम्ही का सांगता? गुजरातची पाकिस्तानशी तुलना करून तुम्ही महाराष्ट्रालाही दुख देत आहात. ‘फॉक्सकॉन’सह इतर अनेक प्रकल्प बाजूच्या राज्यांत गेले. ते कोठे गेले यापेक्षा महाराष्ट्राने ते गमावले याची टोचणी आहे. राज्यात गुंतवणूक यावी यासाठी पूरक वातावरण निर्माण करावे लागते. असे वातावरण असणे हे महाराष्ट्राचे वैशिष्टय होते. मात्र आजच्या सत्ताधाऱ्यांचे त्याकडे लक्ष नाही. महाराष्ट्राचे वातावरण हे तणावाचे, अस्थिरतेचे व स्फोटक आहे. भाजपच्या प्रेरणेने शिंदे गट जिल्हय़ाजिल्हय़ांत स्वतःच्या टोळय़ा निर्माण करून ठग आणि पेंढाऱ्यांप्रमाणे काम करीत आहे, असं सामनाच्या आग्रलेखात म्हटलं आहे.

काही लोक असे असतात की, ते जोडतात व पेंढाऱ्यांप्रमाणे लूट करतात. असे वातावरण निर्माण होणे उद्योग, व्यापार वगैरेंसाठी बरे नाही. त्यात महाराष्ट्राचे हित आहे काय? याचा विचार फडणवीस यांनी करायचा आहे. मुंबई-ठाण्यातील रस्ते पावसात जलमय झाले. खड्डय़ांमुळे रस्ते आणि वाहतूक कोलमडली. मुंबई, नाशिक, पुणे वगैरे रस्त्यांवर लोक बारा बारा तास अडकून पडले. सर्वाधिक परिणाम ठाणे शहरात झाला. ठाण्यात कालपर्यंत शिवसेनेच्या नावाने शिंदेच राज्य करीत होते. त्यामुळे भाजपचे ‘शेलार’ ज्या ‘दहा टक्के’ हिशेबाची बात करीत आहेत त्याचा हिशेब ठाण्यातूनच घ्यायला सुरुवात केली पाहिजे व फडणवीस यांनी त्याबाबत चौकशीचे आदेश द्यायला हवेत. कल्याण-डोंबिवली भागाचा दौरा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला व या तथाकथित स्मार्ट सिटीची लक्तरेच त्यांनी काढली. रस्ते नाहीत, खड्डय़ांचे राज्य, गचाळ कारभार पाहून ठाकूर अधिकाऱ्यांवर भडकले. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई ही औद्योगिक शहरे आहेत. तेथे एमआयडीसीपासून इतर अनेक प्रकल्प आहेत, पण या औद्योगिक शहरांचा ‘नरक’ कोणी केला? या भागाचे खासदार कोण? या भागातील आमदार शिंदे गटात गेले. नगरसेवकही पेंढाऱ्यांप्रमाणे त्याच टोळीत गेले. शहरे विकून खाणाऱ्यांकडून औद्योगिक प्रगती कशी होणार? ‘मनसे’चे आमदार हे फडणवीस सरकारचे समर्थक आहेत. या भागातील आमदार राजू पाटील यांनी सत्यच समोर आणले. ‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिका फक्त सेटिंगमध्येच स्मार्ट आहे. मग ती टक्केवारी असो नाहीतर पुरस्कार. येथे फक्त सेटिंग चालते,’ असे सरकार समर्थक आमदार जाहीरपणे बोलतात. हे असे वातावरण कायम राहिले तर नव्या गुंतवणुकीवर परिणाम होईल व त्याच अस्थिर, अशांत परिस्थितीमुळे फॉक्सकॉनसारखे प्रकल्प हातून जात आहेत काय? यावर फडणवीस सरकारने विचार करणे गरजेचे आहे. विकासात कोणी महाराष्ट्राच्या पुढे धावले म्हणून वाईट का वाटावे? सर्व राज्यांनी आपापला विकास केला तरच देश प्रगतिपथावर जाईल. मग गुजरात काय किंवा उत्तर प्रदेश, बिहार काय! योगी आदित्यनाथ मुंबईत येतात. ममता बॅनर्जी व इतर राज्यांचे मुख्यमंत्री येथे येऊन उद्योगपतींना आवाहन करतात. हेच मुंबई-महाराष्ट्राचे वैशिष्टय. मुंबई सगळया देशाचे पोट भरते, असं देखील आग्रलेखात लिहिलं आहे.

दरम्यान, लाथ मारून कोणी वेगळे काही करत असेल तर मात्र महाराष्ट्राला वाघाचा पंजा मारावा लागेल. उत्तर प्रदेशात फिल्म सिटी होत आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नामिबिया देशातून आठ चित्ते आणून मध्य प्रदेशातील ‘कुनो’ अभयारण्यात सोडले. त्यामुळे तेथील पर्यटन उद्योगास बरकत येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याचा आम्हाला आनंद आहे. हे चित् विदर्भातील ताडोबा जंगलात, पेंच अरण्यात का सोडले नाहीत? असे प्रश्न आमच्या डोक्यात येणार नाहीत. मध्य प्रदेश काय किंवा गुजरात काय, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र … प्रत्येक राज्य आमचेच. जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यावर तेथे मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होईल, बाहेरचे उद्योगपती येऊन कश्मीरात जमीन जुमला घेतील, असे सरकारतर्फे सांगण्यात येत होते. एखादा फॉक्सकॉन जम्मू-कश्मीरात गेला असता तर तेथील राष्ट्रवादी जनतेच्या आनंदास पारावर उरला नसता. भरकटलेल्या तरुणांच्या हातास रोजगार मिळाला असता व बाजूच्या पाकडय़ांनाही विकासाच्या माध्यमातून चोख उत्तर मिळाले असते. जसे गुजरात पाकिस्तान नाही तसे जम्मू-कश्मीरही पाकिस्तान नाही. पंतप्रधान, गृहमंत्री गुजरातचे म्हणून सर्व प्रकल्प, उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत. त्यासाठी केंद्रातील एक अदृश्य यंत्रणा काम करीत आहे, असे भ्रमाचे वातावरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी बरे नाही. गुजरातमधील गुंतवणूक वाढीची पोटदुखी महाराष्ट्राला नाही. एकदा भाऊ म्हटल्यावर वाद राहतोच कोठे? वाद निर्माण करून दुफळय़ा निर्माण करणारे दुसरेच आहेत. महाराष्ट्रातील वातावरण उद्योग-व्यापारासाठी सध्या निकोप नाही. महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरू आहे. पुन्हा उद्योग-व्यापाराची कत्तल करायला महाराष्ट्रावर ‘ईडी’च्या लुटारू फौजा सोडल्या आहेतच. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचा नवा हिशेब घ्यायला शेलारांचे नियोजन मंडळ आहेच, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांवर सामनातून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!