🕒 1 min read
मुंबई : हॉटेल उधारी प्रकरणानंतर शेतकरी नेते सदाभाऊ खोत चांगलेच चर्चेत आहेत. या प्रकरणानंतर सदाभाऊंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी फेसबुक पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांनी पवारांवर टीका केली. “महाराष्ट्राच्या राजकारणात ६० वर्षांनंतर मोठी उलथापालथ बघायला मिळाली. याच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस आहेत. २०१४ साली भाजपने कॉंग्रेस पक्षाचा पराभव केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विरोधाचे वारे वाहू लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तेची मगरमिठी सैल झाली,” असे सदाभाऊ खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत यांची FACEBOOK POST
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बदलाचे वारे वाहू लागले. महाराष्ट्रात अठरापगड जातीचे लोक राहतात. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक ते वसंत दादा पाटील या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीवर दृष्टीक्षेप टाकला तर एक गोष्ट लक्षात येते या तिघांनी गावगाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आवश्यक गोष्टींवर भर दिला आहे. रस्ते, शेतीला व पिण्याच्या पाण्याची सोय, तंत्रज्ञान, नवीन उद्योगधंदे यांना चालना दिली. याच काळात यशवंतराव चव्हाण यांनी धनंजयराव गाडगीळ, विखे पाटील, तात्यासाहेब कोरे यांच्या सारख्या प्रत्येक जिल्ह्यातील विकासाची ओढ असणाऱ्यांना हाताशी धरून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. गावगाड्यातील माणसांना बरोबर घेऊन सहकारी चळवळीची वाटचाल सुरू झाली. ८० च्या दशकात महाराष्ट्रात विकासाचे वारे वाहत होते.
कालांतराने राजकारणात दुसरी पिढी आली.या पिढीचे नेतृत्व शरद पवार साहेब करू लागले. शरद पवार यांनी कावेबाज डावपेच आखत पुरोगामी विचारसरणीचे, समाजवादी विचारांच्या नेत्यांच्या कमकुवत बाजू हेरल्या. त्यांच्या कमकुवतपणाचा शरद पवार यांनी पध्दतशीरपणे फायदा उठवला. यामधे शेतकरी कामगार पक्ष,प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी, शरद जोशी यांची संघटना, पुरोगामी चळवळीतील वेगवेगळ्या विचारसरणीच्या संघटना यांना बरोबर घेत कॉंग्रेस अंतर्गत स्वत:चा गट तयार केला.
महत्त्वाकांक्षी मनोवृत्तीच्या शरद पवार यांच्या लक्षात आले की काँग्रेस तळापर्यंत रूजली आहे. या पक्षावर गांधी आणि नेहरू घराण्याचा मोठा पगडा आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात आपल्याला शिरकाव करणे कठीण जाणार आहे. अशावेळी संपूर्ण महाराष्ट्रावर सत्ता प्रस्थापित करायची असेल तर आर्थिक साधने हाताशी पाहिजेत. त्या काळात ही आर्थिक साधने सहकारी क्षेत्रात एकवटली होती. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने,सूत गिरण्या,बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बँक, शिखर बँक, पतसंस्था, दूध संघ, गृहनिर्माण संस्था यावर शरद पवार यांची नजर होती. सहकार क्षेत्रातील आर्थिक आणि मनुष्यबळ यावर वर्चस्व प्रस्थापित केल्याशिवाय उर्वरित महाराष्ट्र पादाक्रांत करण्यासाठी जमणार नाही हे त्यांनी हेरले.
यशवंतराव चव्हाण यांच्या कृपेने सत्तेत शिरलेल्या शरद पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातील सहकारी चळवळीतील प्रस्थापित नेत्यांना हलवायला सुरुवात केली. ८० च्या दशकात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सहकारी क्षेत्रात रणकंदन माजलेले दिसेल.याला शरद पवार यांचा छुपा पाठिंबा होता.या काळात सहकार क्षेत्रात अनेक जिल्ह्यांत युद्ध सदृश्य वातावरण होते. आपला गट निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी दारुगोळा पुरवला. काही जिल्ह्यात हे युद्ध इतक्या खालच्या थराला गेले की सहकार क्षेत्राची यथेच्छ बदनामी झाली.
पण आपले शिलेदार आणि सरदार तयार करण्याच्या नादात शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात शब्दशः यादवी माजवली. या क्षेत्रावर आपला एकक्षत्री अंमल तयार करण्यासाठी शरद पवार यांनी जनतेच्या तिजोरीतील पैशाचा सढळ हाताने वापर केला. वेगवेगळ्या अनुदानांची लालूच दाखवून सगळे सहकारी क्षेत्र काबीज केले.
सहकारी क्षेत्र आपल्या दावणीला बांधताना शरद पवार यांच्या लक्षात आले की सहकारी क्षेत्राच्या बाहेर असलेला, वेगवेगळ्या जातीत विभागलेला मोठा जनसमुदाय कब्जात आणायचा असेल तर त्या जनसमुदायाच्या जातीत आपला सरदार तयार केला पाहिजे. पवारांनी वेगवेगळ्या जातीतील नेतृत्वाला खतपाणी घातले. त्यांना जिल्हा परिषद, जिल्हा बँक, आमदार, खासदार, मंत्री पदाची लालूच दाखवून आपल्या बरोबर राहतील, अशी व्यवस्था केली. यातून पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादाची पेरणी करण्याच पाप शरद पवार यांनी केले. वेगवेगळ्या जातीत मातब्बर नेता तयार करण्याची जातीयवादी खेळी केली.
या मक्तेदारीच्या राजकारणात शेतकरी, शेतमजूर,बारा बलुतेदार यांची जाणिवपूर्वक मुस्कटदाबी करण्यात आली.ही एक प्रकारची गुलामगिरीची व्यवस्था निर्माण केली गेली.या गुलामगिरीतून सर्वसामान्य जनतेची मुक्तता करण्याची सुरूवात २०१४ नंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली.यात त्यांना १०० टक्के यश जरी मिळाले नसले तरी ५० टक्के यश मिळाले असे मी मानतो.जातीपातीच्या आणि ठराविक घराण्यांच्या गुलामगिरीतून जनतेने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली.
पारतंत्र्याच्या या बेड्या फडणवीस साहेबांनी तोडायला सुरुवात करताच पवार साहेबांचे धाबे दणाणले.असे झाले तर आपला एकेक सरदार अस्तंगत होवून आपला राजकीय पाया उखडला जाईल या भितीने शरद पवार यांना ग्रासले.असे झाले तर आपल्या घरातील सत्ता,ती चालवणारी नातू मंडळी यांच काय होणार? यातूनच येनकेन प्रकारेण सत्ता काबीज करण्याचा कुटील डाव खेळण्यात आला.आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दिर्घ कालावधीत जे प्रश्न पवार साहेब सोडवू शकले नाहीत त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उदाहरणार्थ मराठा आरक्षण, धनगर समाज आरक्षण.त्या त्या समाजाला मिळाले नाही. शेतीमालाला भाव मिळाला नाही.परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ होत राहिली.या प्रश्र्नांकडे दुर्लक्ष करुन जाती जातीत संघर्ष निर्माण करणारी आंदोलने जाणिवपूर्वक पेटवण्यात आली. जेणेकरुन जनतेमध्ये असंतोष पसरून जनक्षोभ तयार होईल.
याला पूरक वातावरण तयार करण्याचे काम पवार यांच्या आश्रयाने राहणा-या लेखण्यांनी केले.पवार यांची खासियत ही की त्यांनी नावारूपाला आलेल्या अनेक तथाकथित विचारवंत आणि लेखकांना आपल्या समृद्ध दावणीला बांधले.या लाळघोट्या विद्वानांना मलिदा चारण्यात आला. कोणाला शहरात फ्लॅट, साहित्य महामंडळावर वर्णी, साहित्य संमेलनाला देणग्या, परदेश दौरा अशी खिरापत वाटून विचारवंत लेखकांना आपलेसे करण्यात आले. आपल्या लेखन कसब दाखवून बारामतीकरांची मर्जी सांभाळण्यात या लाचार विचारवंतांनी आपले उखळ पांढरे करून घेतले.बहुजन समाजातील तरूणांचे दिशाभूल करण्याचे काम या भाडोत्री विचारवंतांनी इमानेइतबारे पार पाडले. या दिशाभूलीतून बहुजन समाजाला दुबळे करण्यात आले. राजकारणातील हे षडयंत्र तोडण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.म्हणून त्यांच्या विरोधात रान उठवण्यात आले.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक ब्राम्हण कसा होवू शकतो असे फुत्कार सोशल मीडियातून ऐकू येवू लागले. प्रशिक्षण देवून सोडलेले या श्वानांनी पिसाळल्या प्रमाणे लचके तोडायला सुरुवात केली. अनाजीपंत, टरबुज्या अशी हलक्या पातळीवरची दूषणे फडणवीस साहेबांवर लावण्यात आली.
पण फडणवीस साहेबांनी कमालीचा संयम दाखवत या भुंकणाऱ्या श्वानांकडे दुर्लक्ष केले. या विषारी आणि विखारी प्रचाराच्या विपरीत परिस्थितीत ही त्यांनी २०१९ साली सर्वाधिक जागा मिळवत सत्ता खेचून आणली. पण सत्तेच्या दलालांनी आणि मक्तेदारांनी फडणवीस साहेबांचा धसका घेतला होता. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. दरवर्षी उफाळणारे ऊस दराचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. एफ आरपी नियमितपणे मिळू लागली. त्यांच्या काळात ९९% ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना पोहोचती झाली. कर्जमाफीची १९००० कोटी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली.दूध दराचा प्रश्न त्यांनी संयमाने निकालात काढला. असे अनेक प्रश्न सोडवले.विस्तारभयास्तव त्यांचा उल्लेख करत नाही.
सर्व सामान्य जनतेचे हे प्रश्न असेच सुटत गेले तर आपल्या सत्ता आणि संपत्तीचा पाया उखडला जाईल या भीतीने सत्तापिपासू मक्तेदारांनी उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून फडणवीस साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. फक्त आणि फक्त सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी तीन त्रिकूट एकत्र आले. जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा विरुद्ध अभद्र युती तयार झाली.
पण या सत्तापिपासू मक्तेदारांना जोरदार चपराक राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने बसली आहे. मराठी माणसाच्या प्रश्र्नांच्या सोडवणूकीसाठी उभी राहिलेली शिवसेना लुटालूट करणाऱ्या बारामतीकरांच्या कब्जात कधी टाकण्यात आली हे सामान्य शिवसैनिकांना ही कळाले नाही.
पण राज्यसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देवेंद्र फडणवीस या खऱ्याखुऱ्या मावळ्यांनी पहाटे शाहिस्तेखानाची जुलमी बोटे छाटली. सत्तेच्या मक्तेदारांची पकड ढिली झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वैभवशाली देवेंद्र फडणवीस युगाची तुतारी फुंकण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा शिवरायांचा स्वाभिमानाचा भगवा मंत्रालयावर फडकवल्याशिवाय देवेंद्रजी थांबणार नाहीत हा आत्मविश्वास महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेत निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
