मुंबई – उत्तर प्रदेशमधील बदायूमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने काल राज्यभर महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन सकाळी ११ वाजता सुरू झाले. राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर जमून घंटानाद करीत निदर्शने करत टपाल मास्तर यांना महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अजय बिष्ट यांच्या नावे लिहिलेली पत्रे त्यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी दिली.
महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे येथील लक्ष्मी रोड,सिटी पोस्ट टपाल कार्यालयाबाहेर आंदोलनाची सुरुवात केली. उत्तरप्रदेश बदायु इथे एका भगिनीवर घडलेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ आज मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने निषेधाची पत्र पाठवण्यात आली.
फक्त शहरांची नावे बदलण्यातच हे मुख्यमंत्री मश्गुल असून त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या ५० वर्षीय महिलादेखील या राज्यात सुरक्षित नाहीत. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. नामुष्की सहन करावी लागत आहे अशा आशयाची ही पत्रे राष्ट्रवादी महिलांकडून लिहिली गेली असून त्याचा भला मोठा गठ्ठा महाराष्ट्रातून आज पाठवण्यात आला असे महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी सांगितले.
समस्त देशाचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीमध्ये आज सर्वात जास्त गुन्हे होतात. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होतात हे अत्यंत खेदजनक आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट आहेत असा आरोपही चाकणकर यांनी केला.
ज्यांना ‘योगी’ आदित्यनाथ म्हणून देश ओळखतो पण गुन्हेगारांचे आणि गुन्हयांचे नंदनवन असलेल्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘योगी’ हे संबोधन वापरण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही असे सांगत यावर कळस केला म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखीदेवी यांनी. पीडित परिवाराला भेटण्यास जाऊन आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘जर पीडित महिला संध्याकाळच्या वेळी एकटी गेली नसती तर ही घटना घडली नसती’ असे वक्तव्य केले. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या म्हणून नाही तर एक महिला एका पीडित महिलेबाबत असे वक्तव्य करते हे भयंकर धक्कादायक आहे असे प्रदेशाध्यक्षा चाकणकर म्हणाल्या.
या सर्व पार्श्वभूमीवर देशाला गृहमंत्री आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे प्रचारमंत्री आहेत हे कळायला मार्ग नाही. सदासर्वकाळ अमित शहा हे कोणत्या ना कोणत्या राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असतात. जर पदाला योग्य न्याय देऊ शकत नसतील तर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ प्रचारमंत्री म्हणून काम करावं अशी मागणी प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – उद्धव ठाकरे
- ..हा तर एमआयएमला बदनाम करण्याचा डाव-खा.इम्तियाज जलील
- ‘भाजप कर्मकांडातच व्यस्त’, मित्रपक्षाकडून भाजपला टोला
- ‘बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला’
- कंगनाच्या अडचणीत आणखीन एक भर; मोहिंदर कौर यांनी दाखल केला मानहानीचा खटला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

