मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या शहरांमध्ये (१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका) आणि जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली असेल त्यांना अधिक शिथिलता देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच दुकाने सुरु झाली आहेत.
जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जनतेला देण्यात आलेल्या या सवलतींचा काही ठिकाणी गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत असून कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. विशेषतः मुंबईत मोठी गर्दी उसळल्याचे निर्देशनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आपण असेच गाफील राहिलो तर संथगतीने सुरू होणाऱ्या आयुष्याला पुन्हा ब्रेक लागू शकतो. पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
काल एका कार्यक्रमात बोलताना देखील मुख्यमंत्र्यांनी याबाबत संकेत दिले होते. ‘मेट्रोच्या कार्यक्रमाला येताना मला मुंबईत मोठी वाहतूक कोंडी दिसली. ही चिंता करणारी गोष्ट आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मुक्त संचार केला तर याद राखा, निर्बंध अधिक कडक केले जातील,’ असा इशारा यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईकरांना दिला. ‘मी काल लॉकडाऊन उठवत असल्याचं तर काही चुकून बोललो नाही ना असं मी अधिकाऱ्यांना विचारलं. इथं येताना रस्त्यावर बरीच गर्दी दिसली हे योग्य नाही. मुंबईत जर अशीच गर्दी कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- बेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या; भाजपची जोरदार मागणी
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच फडणविसांनी घेतली भेट; राष्ट्रवादीची सारवासारव
- ‘मुल्क से बढकर कुछ भी नही’ त्या प्रकरणावर मितालीने सोडले मौन


