मुंबई : जवळपास दोन वर्षांपूर्वी देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘सलग दोन वर्षे देशातील जनतेने कोविड प्रतिबंधक नियमांचे नेटाने केलेले पालन , कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारला दिलेली साथ, लसीकरणाच्या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, यामुळेच कोरोनाची उपद्रव शक्ती कमी झाली. त्यामुळेच केंद्रीय सरकारने दोन वर्षांपूर्वी लादलेले सर्व निर्बंध 31 मार्चपासून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर ही दोन बंधने मात्र पाळावीच लागतील. केंद्राने हटवलेले निर्बंध हे एक प्रकारचे दुसरे स्वातंत्र्यच आहे. मात्र पुन्हा निर्बंधांचे पारतंत्र्य येऊ नये, याची काळजी देशातील प्रत्येक नागरिकाला घ्यावीच लागेल. कोरोनाच्या लढाईत आपण पाच लाखांहून अधिक देशबांधवांना गमावले आहे, हे विसरून चालणार नाही.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारने राज्य सरकारांना वेळोवेळी दिशानिर्देश देऊन कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची सक्तीने व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राजकीय चिखलफेकीचे किरकोळ प्रकार वगळता केंद्र व तमाम राज्य सरकारांनी या वैश्विक संकटाच्या कठीण काळात हातात हात घालून काम केले. तब्बल 24 महिने कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या. प्रत्येक टप्प्यावर कोरोनाच्या साथीने जसजसे उग्र रूप धारण केले, तसतसे निर्बंधांमध्ये बदलही होत गेले. ‘जिथे आहात तिथेच थांबा’ या आदेशासह देशभरात लागू करण्यात आलेला लॉक डाऊन आणि त्याबरोबरच कोरोनाला रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या प्रत्येक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात जनतेनेही केंद्र व राज्य सरकारांना मोलाची साथ दिली. हे निर्बंध म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर आणलेली गदा नसून आपल्याच जीविताचे रक्षण करण्यासाठी सरकारला नाइलाजाने ही पावले उचलावी लागत आहेत, हे जनतेनेही पुरेपूर ओळखले होते. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे आणि कोविड प्रतिबंधक आचारसंहितेचे कसोशीने पालन केले.’
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभेच्या सीटसाठी ‘भगवंत मान’ यांच्याकडे लावतोय मस्का! कपिल शर्मा पुन्हा ट्रोल
- “कुठल्याही विभागाला दुर्लक्षित ठेवण्याची माझी भूमिका नाही”- अजित पवार
- वनविभागातर्फे सुरू असलेल्या गॅबियन बंधाऱ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार – निलेश लंके
- “… तर आम्ही ही कमी पडणार नाही”- ओमराजे निंबाळकर
- आमदारांना 300 घरं देणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत मोठी घोषणा


