टीम महाराष्ट्र देशा : सांगली आणि कोल्हापुरात महापुराने जनजीवन उध्वस्त झाले आहे. या भागातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपल्या खासदारनिधीतून 50 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोल्हापूर येथे केली. रामदास आठवले आज हैद्राबाद मार्गे कोल्हापूरात सकाळी दाखल झाले. त्यांनंतर त्यांनी कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी केली. त्यानंतर सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी; पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्याला 25 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्याला 25 लाख असे एकूण 50 लाख रुपयांचा निधी खासदरनिधीतुन देणार असल्याची घोषणा केली.
यावेळी आठवले म्हणाले की, महापुरासारख्या संकटाचा सामना या पूरग्रस्तांना करावा लागत आहे. झालेली दुर्घटना भीषण गंभीर आहे. या संकटकाळात आम्ही पूरग्रस्तांसोबत आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जलसंधारण खात्याचे मंत्री असताना महापूर येऊ नये तसेच दुष्काळी भागात पाणी मिळावे म्हणून नदीजोड प्रकल्प 70 वर्षांपूर्वी देशाला सुचविला होता. त्यानुसार नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात सुरू करावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कडे आपला पाठपुरावा सुरू असून पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार ला द्ययाच्या सूचना आणि पुरग्रस्तांच्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच मांडणार आहे.
कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी कोल्हापूर शहर आदी भागांत रामदास आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत अडचणी व तक्रारी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पुरग्रस्तांच्या भेट घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेला महापूर हा महाजलप्रलय होता. त्यातून या पुरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची आणि मदतीची गरज आहे. या पुरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वांनी मिळून पुरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
सांगली आणि कोल्हापुरात कमी वेळात अतिप्रचंड पाऊस झाला. त्या अतिवृष्टीने महापूर आला. त्या महासंकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना शासन प्रशासन आणि स्थानिक शेजारील गावकरी मदत करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व जण माणुसकीचे हात पुढे करीत असून पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.आशावेळी कोणीही राजकारण न करता माणुसकी जिवंत ठेऊन मदतीसाठी पुढे यावे. तसेच अधिक चांगली मदत पूरग्रस्तांना होण्यासाठी शासनाला सूचना कराव्यात असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
जगदंब क्रीएशन्स आणि स्वराज्यजननी जिजामाता मालिकांचं एक दिवसाचं मानधन पूरग्रस्तांसाठी
नागपूरला पूरस्थिती असती, तर मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले नसते
‘एक हात मदतीचा’ उपक्रम : पूरग्रस्तांसाठी आमदार लांडगे यांनी जपली ‘माणुसकी’!


