मुंबई – चालु महिन्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचे भयानक संकट आलं.ज्यात लाखो शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले. खरीपाचे पिके 100 टक्के पाण्याखाली गेल्याने शेतीचा चिखल झाला. 750 जनावरे वाहुन गेली तर 30 पेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले. नाही म्हटल तरी एक हजार कोटीपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. सरकार पातळीवर कवडीची मदत अद्याप मिळालेली नाही. मुख्यमंत्री येवून गेले पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांनी ढुंकुन पाहिलं नाही. सरकारी पातळीवर नुकसान पंचनाम्याला गती नाही. मराठवाड्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये 06 मंत्री असताना एकही मंत्री या प्रश्नावर बोलत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. अशोकराव चव्हाण, धनंजय मुंडे, राजेश टोपे, अमित देशमुख, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अधुनमधुन माध्यमांत ही चेहरे लोकांना पहायला मिळतात पण मराठवाड्याच्या संकटावर हे मंत्री मुग गिळुन गप्प का?हा सवाल आता मराठवाड्यातील जनता करत असल्याचे भाजपनेते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
आपल्या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले, चालु महिन्यात एकुण पर्जन्यमानापैकी मराठवाडा विभागातल्या सर्व जिल्ह्यात जास्तीचा पाऊस झाला. प्रशासकीय आकडा आला नसला तरी 20 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचा आणि खरीप पिकाचा चिखल होवुन बसला.750 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांची जनावरे पुराच्या पाण्याने वाहुन गेली. 30 ते 35 लोकांचे बळी अतिवृष्टीमुळे गेले. चांगली घरे पडली. काही वाहुन गेली. खरीपाचं पिक कापुस, सोयाबीन, मका, मुग 100 टक्के उद्धवस्त झाले. उसासारखं हक्काचं उत्पादन आडवे पडलं. एकुणच चित्र पाहता खरडुन गेलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या पोटाला पिळ देण्यासारखं संकट आहे. वास्तविक पाहता अशा संकटात माय-बाप सरकारने तात्काळ मदतीला धावून येताना काही तरी पदरात टाकायला हवं.पण राज्यकर्त्यांची संवेदनशीलता जेव्हा शुन्यावर येते तेव्हा मुर्दांड मनाचे राज्यकर्ते सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या मदतीला कधीच येत नाहीत हे दुर्दैव म्हणावं वाटतं.
दुसऱ्या बाजुने जाणीवपूर्वक ठाकरे सरकारकडुन मराठवाडा टार्गेट केला जातो की काय विकासाच्या अनेक योजना दोन वर्षात रद्द केल्या.वॉटरग्रीड आणि क्रीडा विद्यापीठ रद्द करणं म्हणजे पाहुण जेवायला बसल्यानंतर वाढलेलं ताटच हिसकावुन घेणं असं चित्र मराठवाड्यात दिसत आहे. दोन वर्षापासुन शेतकऱ्यांना विम्याची कवडी मिळालेली नाही. खरं तर केंद्र सरकार सहभागी निधी तात्काळ उपलब्ध करून दिला. पण विमा कंपन्या आणि राज्य सरकार यांनी काही तरी काळंबेरं करून सामान्य शेतकऱ्यांना विम्यापासुन वंचित ठेवलं आहे. निसर्गाची अवकृपा अतिवृष्टीने उद्धवस्त झालेला शेतकरी, पिकाचे नुकसान हे चित्र पाहिल्यानंतर विम्यासारखा जो शेतकऱ्यांचा हक्क आहे तो पैसा मिळाला असता तरी थोडासा दिलासा शेतकऱ्यांना झाला असता. पण निगरघट्ट दगडी मनाचं सरकार राजकिय द्वेषापोटी या विभागाकडे पहायला तयार नाही असंच म्हणावे लागेल.
अगदी निजामाची राजवट मराठवाड्यातील जनतेला पुर्नउजाळा दिल्यासारखं डोळ्यासमोर येत आहे. कारण परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादेत येवून गेले. असं वाटलं होतं राज्याचे प्रमुख आल्यानंतर आमचे दु:ख पाहतील. प्रत्यक्ष आम्हाला भेटतील. डोळ्यातले आश्रु पाहिल्यानंतर दयामाया काहीतरी येईल. कारण त्यांचेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडुन मराठवाड्यातील शेतकरी ओक्साबोक्सी रडले होते. कदाचित सत्ताधाऱ्याना शेतकऱ्यांचे रडणे म्हणजे थट्टा वाटली असावी. मंत्र्यांचा गळा काय आणि मुख्यमंत्र्यांचा गळा काय तरीही शेतकऱ्यांचं दु:ख ठाकरे सरकारला दिसलं नाही. दौऱ्यावर आल्यानंतर साधं ढुंकुनही शेतकऱ्यांकडे त्यांनी पाहिलं नाही. ना मदत ना कशाची घोषणा. ते आले आणि गेले. बीड जिल्ह्याला कवडी दिली नाही. जिथे शिवसेनेचे आमदार तिथे मात्र काही विकास प्रश्नासाठी मदत जाहिर केल्याचे चित्र पुढे आले.
एक काळजीचा प्रश्न डोळ्यासमोर सर्वांच्या येतो तो म्हणजे मराठवाड्यातील जनतेवर एवढं संकट आलं असताना विभागातुन असलेले सत्ताधारी मंत्री या प्रश्नावर आवाज का उठवत नाहीत? मुग गिळून गप्प का बसतात? मुख्यमंत्री औरंगाबादला आल्यानंतर वरीलपैकी एकाही मंत्र्याने साधं शेतकऱ्यांचं दु:ख सुद्धा पहायला बांधावर त्यांना आणलं नाही. राजकीय उदासीनता म्हणावी का मंत्र्यांची निष्क्रियता? जणु काही या मंत्र्यांना आपल्या भागातील प्रश्नाचं काही देणंघेणं नाही या आविर्भावात सन्माननिय मंत्री वागत आहेत. विम्याच्या प्रश्नावर एकानेही आवाज उठवलेला नाही. वॉटरग्रीड असेल, क्रीडा विद्यापीठ असेल मंत्री अशोकराव चव्हाण, राजेशजी टोपे, धनंजय मुंडे यांच्यासारखी मंडळी अनुभवी असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चकार शब्द काढत नाहीत. याचं नेमकं कारण कळायला तयार नाही.
खरंच या मंत्र्यांना पुळका असता तर मुख्यमंत्र्यांच्या समोर कैफियत मांडुन दौऱ्यादरम्यान काही तरी घोषणा करायला भागच पाडली असती. अशा गंभीर संकटात या भागातील लोकांना स्व.विलासराव देशमुख, स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यासारख्या लढाऊ राजकारण्यांची आठवण होत आहे. कारण आपल्या विभागातल्या प्रश्नावर सतत जागे राहुन हे नेते हक्काने भांडत होते. 1995 ला गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असताना ऊसतोड कामगारांचा प्रश्न मराठवाड्यातुन जेव्हा चिघळला होता तेव्हा आपल्या माणसासाठी या नेतृत्वाने उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग घेतला होता आणि आज एवढं भयानक संकट असताना वरीलपैकी एकही मंत्री शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत नाही हे राजकिय दुर्दैव म्हणावे लागेल. संकटापेक्षा त्यांना आपल्या पदाच्या खुर्च्या महत्वाच्या वाटतात. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात एकच दादा आहे. त्यांच्या पुढे कुणाचं चालत नाही. सांगली, सातारा, कोल्हापुर अतिवृष्टी झाली तर आपत्ती निकष बदलुन त्या भागातील शेतकऱ्यांना मदत केली. येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नोहे या उक्तीप्रमाणे मराठवाड्यातल्या मंत्र्याबबत शेतकरी आणि सर्वसामान्य जनता संतापुन गेली आहे. केवळ पदाच्या खुर्च्या स्वत:च्या विकासासाठी मग मराठवाड्यासाठी का नको?असा सवाल लोक विचारू लागले.
हे संकट एवढं भयानक आहे की त्याची तीव्रता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागात भेट दिल्यानंतरच कळुन चुकते. मुंबईत बसुन शेती नुकसान कधीच पहायला मिळत नाही. दौऱ्या दरम्यान कदाचित मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते तर मग नुकसानीचं दु:ख त्यांना कळालं असतं. पण मंत्र्यांनी साधं त्यांनी यावं आणि पहावं यासाठी उठाठेव केल्याचंही प्रशासकीय पातळीवर ऐकिवात नाही. नेमकं हे मंत्री गप्प का बसतात?हा प्रश्न आता शेतकऱ्यांनाही पडला आहे. सरकारी पंचनामे अजुन सुरू आहेत. उद्या परवा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. जिथे थोडं फार वाचलं ते पण आता येणाऱ्या पावसामुळे जावु शकतं अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात आहे. विम्याचं काही खरं नाही. पुन्हा विमा कंपनीने अनेक नाटकं नुकसानीबाबत करायला सुरूवात केलं. कुठे शेतकऱ्यांजवळ मोबाईल आहे. त्या अ;ॅन्ड्राईड मोबाईल चालवताच येत नाही. जर चालवता आला तर रेंज येत नाही. असे अनेक टेक्नीकल प्रश्न पुढे आहेत. प्रशासकीय पंचनाम्याच्या आधारे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा मंजुर करणे ही आता काळाची गरज आहे.त्यासाठी तरी किमान मराठवाड्यातल्या मंत्र्यांनी प्रशासन आणि विम्या कंपन्यांना कामाला लावणे महत्वाचे वाटते.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

