मुंबई : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी संसदेमध्ये केलेले भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच राहुल यांच्या भाषणावर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत असल्याचेही बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी देखील आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘माझ्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी शरीरावर ३५ गोळ्या झेलल्या. माझे वडील राजीव गांधी हे सुद्धा देशासाठीच हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? मला माझा देश चांगला माहीत आहे, असा तीर राहुल गांधींनी सोडला व त्यामुळे सत्ताधारी घायाळ झाले. चिनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनचे एजंट ठरवणे म्हणजे राज्य करणे नव्हे. राहुल गांधी यांनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच.’
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले की, कालच्या अर्थसंकल्पामुळे गरीब लखपती बनले आहेत, मालामाल झाले आहेत. भाजपचे कार्यकर्ते मोदींच्या भाषणावर टाळय़ा वाजवतील, त्यांचा जयजयकार करतील. नव्हे, तसा तो केलाच. हे नवलखपती नक्की कुठे आहेत? पंतप्रधान मोदी म्हणतात, पंतप्रधान घर योजनेत तीन कोटी गरीबांना घरे देऊन सात वर्षांत लखपती बनवले. म्हणजे पंतप्रधानांनी गरीबांचे पैसे इस्टेटीत गुंतवले आहेत. त्याचवेळी लोकसभेत राहुल गांधी यांनी मोदींच्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे. मोदी यांनी दोन हिंदुस्थान बनवले. एक श्रीमंतांचा हिंदुस्थान आणि दुसरा धनदांडग्यांचा हिंदुस्थान. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीवर एका शब्दाचाही उल्लेख नाही. याचा अर्थ देशातल्या बेरोजगारीचे उच्चाटन झाले असे नाही.
दरम्यान, सात कोटी बेरोजगार वाढले असून ते गरिबी रेषेच्या खाली आहेत. ८४ टक्के देशवासीयांचे उत्पन्न घटले आहे आणि ते वेगाने गरिबीकडे घसरत आहेत. गांधींचा असा दावा आहे की, यूपीएच्या काळात २७ कोटी गरीबांचे जीवनमान उंचावले, पण मोदी सरकारच्या काळात २३ कोटी लोक पुन्हा गरिबीच्या खाईत ढकलले गेले, असे श्री. गांधी यांनी सांगितले. गांधी हे विरोधी पक्षांचे एक प्रमुख नेते आहेत. विरोधकांच्या भाषणाच्या वेळी पंतप्रधानांनी उपस्थित राहावे असे संकेत आहेत. पंडित नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सगळय़ांनीच ही परंपरा पाळली आहे. अटलजींच्या सरकारविरोधी भाषणाचे पंडित नेहरूंनी कौतुक केले आहे. बॅ. नाथ पैंच्या भाषणाच्यावेळीही नेहरू हजर राहत. मधू लिमये, मधू दंडवते यांच्या भाषणात सत्तापक्षाने व्यत्यय आणला नाही. पिलू मोदी हे इंदिरा गांधींच्या सरकारचे वाभाडे काढत, पण भाषण संपताच इंदिरा गांधी लगेच पिलू मोदींना एक चिठ्ठी पाठवून भाषणाचे कौतुक करीत असत. आता ते दिलदारीचे वातावरण संपले आहे’, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- “बंडातात्यांच्या विधानामागचा मास्टरमाइंड दुसराच”, बाळासाहेब पाटलांचा दावा
- बंडाचा केव्हा ‘सय्यद बंडा’ झाला कळलेच नाही- अमोल मिटकरी
- महाशिवरात्रीपूर्वी येणार अमृता फडणवीसांचे नवे गाणे
- “यह मोदी सरकार है…कोई नही बचेगा”, मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीच्या अटकेवर भाजपची प्रतिक्रिया


