अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, अकोले, श्रीगोंदा ह्या तालुक्यात यापूर्वीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
मात्र, अहमदनगर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण सापडत असून देखील शहरात लॉकडाऊन का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु नगरमध्ये जनता कर्फ्यु अथवा लॉकडाऊन लागू करु नये, अशी मागणी अहमदनगर व भिंगार शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
काँग्रेस पक्षाचे नगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ व भिंगार अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले यांच्यासह कमिटीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात, कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख आणि ना.प्राजक्त तनपुरे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाच्या प्रती पाठवून नगर शहरात लॉकडाऊन, जनता कर्फ्यु लागू करु नये, या मागणीसाठी साकडे घातले आहे.
संपूर्ण देशात आणि राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. लॉकडाऊनमुळे आधीच हातावर पोट असणाऱ्यांचे खूप हाल झाले आहे. आता कुठे बाजारपेठ सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेणे चुकीचे आहे. लॉकडाउन ठेवून काही उपयोग होणार नाही. जे नियम पाळणार नाही त्यांना बाधा होणारच तसेच ज्यांच्याकडे भरपूर आहे ते वर्षभर घरात बसतील परंतु सामान्य गोरगरिबांनी काय करायचं? असे निवेदनात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- आ.लंके यांनी तालुक्यासाठी केलेले कुठलेही एक समाजउपयोगी काम दाखवा- सुजित झावरे
- कंटोंनमेंट झोन वगळता ईतर भागातील हॉटेल्स रिसॉर्टबाबत कार्यप्रणाली जारी
- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आरे दौरा
- बिहारमध्ये जाऊन फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- अहमदनगरमधील शिवसैनिकांना कंगनाचा निषेध पडला महागात, १९ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल


