औरंगाबाद : जळगाव राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणामुळे सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील अनेक नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील व्यापाऱ्यांना भारतीय पुरातत्व विभागाची गट क्रमांक ५० मधील बखळ जमीन व्यवसायासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी अजिंठा विकास प्रकल्प संघर्ष समितीने ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रत्यक्ष भेटी दरम्यान दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील ५० वर्षापासून फर्दापूर बसस्थानक परिसरातील भारतीय पुरातत्त्व विभागाने अधिग्रहीत केलेल्या जागेवर चहा नाश्त्याची छोटीछोटी उपहारगृहे व विविध जीवनावश्यक वस्तूंची दुकाने लाऊन येथील अनेक छोटे व्यावसायिक आपली उपजीविका भागवत होते. वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे हे छोटे व्यावसायिक अगोदरच प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.
अशातच औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रस्ता रुंदीकरणाला सुरुवात करण्यात आल्यामुळे दिड दोन महीन्यापूर्वी फर्दापूर बसस्थानक परीसरात मागील ५० वर्षापासून असलेले अतिक्रमण हटविण्यात आलेले आहे व उर्वरित जागेवर भारतीय पुरातत्त्व विभागाने कूंपन घातले आहे. परिणामी या परीसरात व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या जवळपास तीनशे कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळून या छोट्या व्यवसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अजिंठा विकास प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष कामराज तायडे यांच्या नेतृत्वात व्यापारी संघटनेचे शेख नासेर, हमीद खॉ पठाण, शेख शाकेर, मंसूर पठाण शेख शफिक आदींच्या शिष्टमंडळाने आ.अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदन देऊन केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही ७० वर्षांत काय केलं, याचा हिशोब आणलाय का’
- ‘काहीही लिहू नका, तिला स्वर्गात शांतपणे राहू द्या’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- आंदोलनासाठी दीर्घकाळ सार्वजनिक जागेचा ताबा घेणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाने आंदोलकांना सुनावले खडेबोल
- ‘शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का’?
- फेसबुक करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण स्मार्टवॉच बाजारात आणण्याची तयारी


