🕒 1 min read
नागपूर : नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व वस्त्यांमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिक संघटनांनी आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांची भेट घेतली. या सर्व संघटनांनी नागरिकांच्या जिवित्वाला अधिक महत्त्व देत, या काळात प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
नागपूरमध्ये सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दररोजचा आकडा हजारच्यावर गेला असून रस्त्यावरील व बाजारातील गर्दी कमी करणे महत्वाचे आहे. मात्र रुग्णसंख्या कमी करण्यासाठी किमान आठवडाभर लॉकडाऊन करण्याबाबत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे एकमत झाल्यानंतर गुरुवारी दुपारी या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. शहरातील नागरिक व व्यावसायिकांना पुरेसा दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. शनिवार-रविवार या दोन्ही दिवसात गरज नसेल तर घराबाहेर नागरिकांनी पडू नये असे आवाहनही करण्यात आले होते. तथापि, ही बाब पुरेशी नसल्याने सोमवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात संचारबंदी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या पार्श्वभूमीवर आज नागपूर रेसिडेन्सी हॉटेल शिष्टमंडळ, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ, कूलरनिर्मिती व्यवसायात असणारे व्यवसायिक, फुलांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक, तसेच बांधकाम व्यवसायिक, ऑरेंज सिटी स्टोन क्रशर असोसिएशन व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी या सर्व शिष्टमंडळाला एक आठवडा सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या जीवित्वास सर्वोच्च प्राथमिकता देणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागणार असले तरीही आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या सूचनेनुसार ही सक्ती करावी लागत आहे. व्यापक हीत लक्षात घेता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठी बिग बॉस मधील सर्वात रोमँटिक जोडीचा ब्रेकअप?
- गौतमीचं एक स्मितहास्य आणि चाहते घायाळ
- …अखेर अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ची रीलीज डेट जाहीर
- पैठण पाचोड रस्त्यावरील शेतवस्तीवर दरोडा, सहा गंभीर जखमी
- विराट ब्रिगेड पलटवारासाठी सज्ज ; टीम इंडियाचे तारे दुसर्या टी -२० मध्ये चमकणार?


