खेड – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदूत्वाचा जाज्वल्य विचार केला होता. शिवसेनेने हिंदूत्वावर अनेक निवडणूकाही लढविल्या. पण सध्या सत्तेसाठी शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडलेला दिसतोय. ८० टक्के समाजकारण करणाऱ्या शिवसेनेची सामाजिक बांधिलकीही लोप पावत असल्याचे चित्र कोविडच्या संकटात व कोकणच्या निसर्ग चक्रीवादळाच्या परिस्थितीत दिसून आले. त्यामुळे शिवसेनेची कोकणवासियांच्या प्रति निष्क्रीयता दिसून येत आहे, त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला या निष्क्रियतेची राजकीय किंमत मोजावी लागेल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काल खेड येथे दिला.
खेड येथे भाजपच्या खेड तालुकाच्या वतीने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात प्रविण दरेकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष डॉ विनय नातु, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस राजुभाई रेडीज, चिटणीस संजय बुटाला, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, मंगेश मोहिते, खेड तालुका अध्यक्ष अनिल भोसले, महिला तालुका अध्यक्ष संजीवनी शेलार, केदार साठे आदी उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या उपस्थितीत अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनिकेत कानडे, माजी उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर, हेमंत भोसले, रोहन राठोड, अविनाश माने, सुनील महाडिक, प्रवीण चव्हाण, सचिन चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, शिवसेनेला हिंदुत्व व सामाजिक बांधिलकी या दोन गोष्टीमुळे वेगळा जनाधार प्राप्त झाला होता. परंतू या दोन्ही गोष्टींचा आता शिवसेनेला सोयीस्करित्या विसर पडल्यामुळे जनतेच्या मनात शिवसेनेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. राम मंदीर कधी होणार असे विचारणाऱ्यांना भूमिपूजनाची तारीख निश्चित करून आम्ही चोख उत्तर दिल गेले आहे. कोकणात शिवसेनेला पर्याय म्हणून सामाजिक बांधिलकिची मोठया प्रमाणावर जाण असणा-या भारतीय जनता पार्टीचा कोकणात जनाधार वाढत आहे. कोविडच्या संकटात तसेच कोकणच्या निसर्ग वादळात भाजपने केलेले सेवाभावी कार्य हे अतुलनिय होते. तसेच हिंदुत्वाची भूमिका कोणत्याही परिणामांची पर्वा न करता ताकदीने पुढे नेण्याच काम भाजपा करीत असल्याने हिंदुत्वाच्या आधारे जनाधार वाढविणे फलदायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोविडच्या संकटात मुंबईकर चाकरमान्यांचे आपल्या गावी जाताना अतोनात हाल होत आहे. त्यांच्यासाठी एसटी सेवा पुरविण्यात शिवसेनेचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे सांगत कोकणच्या चाकरमान्यांच्या मनात शिवसेनेविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे दरेकरांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त लोकांना एक महिना लोटूनही सर्वांना मदत मिळाली नसून अनेकांचे विविध प्रश्न आजही प्रलंबित आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारविषयी कोकणवासीयांचा नाराजीचा सूर मोठया प्रमाणात आहे. कोविड आणि निसर्ग चक्रिवादळाच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदधिकारी तसेच दोन्ही विरोधी पक्ष नेते यांचा सक्रीय सहभाग असल्याने भाजपविषयी कोकणच्या जनतेमध्ये आपूलकीचे वातावरण होताना दिसत असल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, भाजपबद्दल विश्वास असल्यानेच चांगले कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. खेडमध्ये एका चांगल्या कार्यकर्त्याचा संच भाजपात आला आहे. भाजप तळागाळात काम करणारा पक्ष असल्याने येथे सर्व कार्यकर्त्यांना पाठबळ आणि सन्मान दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खेडची भूमी जलदगतीने परिवर्तन करणारी भूमी आहे. कधीकाळी येथे शिवसेनेचा नगराध्यक्ष होता. नंतर मनसेलाही जनतेने संधी दिली आहे. आगामी काळात खेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशीवाय राहणार नाही याची ग्वाही देताना दरेकर यांनी भाजपत प्रवेश केलेले अनिकेत कानडे व वैभव खेडेकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतूक केले.
कोकणात येणा-या चाकरमान्यांसाठी १४ दिवस क्वारंटाईनाचा नियम लावण्यात आले आहे. हे फार त्रासदायक आहे. सध्या चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, त्याला त्याच्या व परिवाराच्या उदरनिर्वाहाची काळजी आहे. अशामध्ये १४ दिवस क्वारंटाईन करणे योग्य ठरणारे नाही. त्यामुळे गावच्या ग्रामस्थांची काळजी घेत त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नाही याची काळजी घेत त्यांच्याशी समन्वय साधणे सरकारच्या पातळीवर गरजेचे आहे, तसेच कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा सुलभ प्रवास व गावी जाण्याची ,राहण्याची व्यवस्था यामध्ये महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांच्या मनात महाविकास आघाडी सरकराविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
राज्यातील महिलांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार कधी जागे होणार ?
शंभर किलो पुस्तकांच्या ग्रंथतुलेतून ‘रिपाइं’तर्फे अण्णाभाऊंना अभिवादन
युपीएससी २०१९ चा निकाल जाहीर! अभिषेक सराफ महाराष्ट्रात पहिला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

