सांगली – राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील शेतीलाही याचा फटका बसला आहे. शेतात पुराचे पाणी घुसल्यामुळे प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवरसांगलीतील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी आलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश नितीन राऊत यांनी दिले आहेत.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं, पूरग्रस्त भागात वीज बिल वसूल करू नका, परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिले भरणेसाठी सवलत दिली जाईल. यासोबतच वीज बिल माफी संदर्भात त्यांनी म्हटलं, वीज बिल माफीचा निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ करेल. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. होतं नव्हतं ते सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.यामुळे आधिच संकटात सापडलेल्या नागरिकांना आणखी वीज बिल भरण्याचा डोक्याला ताप नको म्हणून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल वसुलीला स्थगिती दिली आहे.
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुका, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला. या महापुरात महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणांचे सुद्धा आतोनात नुकसान झाले आहे. या पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोणतेही कागद न मागता आम्ही मदत केली, अजून तरी या सरकारने कोणती मदत केली नाही- फडणवीस
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- लोकांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटले- प्रविण दरेकर यांचा आरोप
- मी येतोय, भेटण्यासाठी थांबा… मुख्यमंत्र्यांनी दिला होता निरोप; प्रविण दरेकर यांचा दावा
- पूरग्रस्तांना मदत कधी? प्रश्नाला उत्तर न देता जाणाऱ्या मंत्री राऊत यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल


