मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
राजकीय पक्षांच्या पुरस्कृत पॅनलचा विचार केला तर शिवसेना व भाजप यांच्यात जोरदार चुरस रंगली आहे. तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस देखील मोठ्या प्रमाणात यश मिळवताना पाहायला दिसत आहेत. महाविकास आघाडीचा एकत्र विचार केला तर हे तिन्ही पक्ष मिळून मोठं यश प्राप्त करतील असं चित्र आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘राज्यात महाविकास आघाडीच येणार. आतापर्यंतच्या निकालानुसार महाविकास आघाडीनेच मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडीचं यश हे सगळ्यांचं यश आहे. जनतेने महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला.’ अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; गावातील पराभवानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- शेतकरी लाखोंचा पोशिंदा, मात्र केंद्र सरकार त्यांचा अपमान करतंय – अजित पवार
- घासून नाय, तर विरोधकांची ठासून !, काकोळी ग्रामपंचायतवर फडकला मनसेचा झेंडा
- जयंत पाटलांना सासुरवाडीने धोका दिला; म्हैसाळमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव !
- नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का; 17 पैकी 16 जागांवर शिवसेनेचा भगवा


