टीम महाराष्ट्र देशा : शेतमजुराच्या मुलाने ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे’ या पंक्ती आपल्या जिद्दीने सत्यात उतरवल्या असल्या तरी परिस्थितीने मात्र त्यास जागीच जखडून ठेवले आहे. ही संघर्षकथा आहे भोगजी येथील गोरख मुंडे या विद्यार्थ्याची. आईविना पोरक्या असलेल्या या शेतमजुराच्या मुलाचा ‘मेडीकल’ प्रवेश निश्चित झाला खरा. परंतु, यासाठी लागणारी लाखोंची रक्कम आणायची कोठून ? असा प्रश्न शेतमजूर मुंडे कुटुंबासमोर उभा ठाकला होता.
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका होतकरु कुटुंबातील एका मुलाला चांगले गुण मिळूनही त्याचं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण होतंय की नाही, अशी त्याला धाकधूक होती. मात्र ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना त्या मुलाची माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब त्या मुलाला दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. संघर्षकन्या हे बिरूद मिरवणाऱ्या पंकजा मुंडे यांनी या कृतीतून ते खर करून दाखवलंय.
उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरख मुंडे या विद्यार्थ्याने NEET परिक्षेत 505 गुण मिळवले. त्याचा सोलापूरमधील आश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात क्रमांक मिळाला. तो एमबीबीएसला जाणारा गावातला पहिला विद्यार्थी ठरला. मात्र अर्थिक परिस्थीतीमुळे तो हतबल झाला होता. गोरखच्या सर्व परिस्थितीचं वृत्त एका वेबपोलर्टने दिलं होतं. हे वृत्त पंकजा मुंडेंनी वाचल्यानंतर त्या वृत्ताला कमेंट करत त्यांनी मदत जाहीर केली होती.
आज परळीमध्ये गोरख मुंडे ह्याला वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे रु. १,५१,००० चा धनादेश सुपूर्द केला आणि त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या @MiLOKMAT @milokmatabd https://t.co/SE2ioYJvwE pic.twitter.com/fQmmUqdjuo
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 4, 2019
त्यानंतर आज परळीमध्ये गोरख मुंडे याला पंकजा मुंडे यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे रु. १,५१,००० चा धनादेश सुपूर्द केला आणि त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या “गोरखचा प्रवेश फी मुळे अडकला आहे हे ऐकून मला खूप दुखः झाल होत. त्यातून मी त्याला १ लाख ५१ हजाराचा चेक गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे दिला आहे. मी मोठी बहिण म्हणून त्याच्या पाठीशी उभी आहे. मात्र यापुढे जरी पंकजा मुंडे भेटली नाही तर स्वतःच्या पायावर उभा राहून मोठा डॉक्टर हो अन मी खूप म्हातारी झाल्यावर माझा इलाज कर” अस म्हणत पंकजा मुंडे यांनी गोरखला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


