टीम महाराष्ट्र देशा : नुकतेच शहराजवळ काटेरी झुडपात आढळून आलेल्या अर्भकाची राज्याच्या ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. तर डॉक्टरांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या.
महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रम संपताच बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तालुक्यातील कपिलधार वाडी येथे एका बाभळीच्या काटेरी झुडपात सोमवारी दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक जिवंत आढळून आले होते. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या बाळाला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे त्या बाळाची तब्येत सध्या धोक्याबाहेर आहे.

पंकजा मुंडे यांना सोमवारी ही घटना समजताच त्यांनी डॉक्टरांना त्या बाळाची काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिसांना देखील त्या निर्दयी मातेचा शोध घेण्यास सांगितले होते. बुधवारी बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन त्या बाळाच्या तब्येतीची मोठ्या मायेने चौकशी केली. “तिच्या औषधोपचाराची काळजी घ्या कसलीही हयगय करू नका, काही लागलं तर मी आहेच” असे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या बाळाची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांनी दिली. मुलगी जन्माला आली म्हणून मातेने तिला बेवारस सोडले की, अनैतिक संबंधातून याबाबत अद्यापही तर्क वितर्क लावले जात आहेत. परंतु या घडलेल्या प्रकाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. बाळ रात्रीच्या सुमारासच काटेरी आळ्यात टाकले असावे. त्यामुळे ते रडून रडून शांत झाले होते. सकाळी सापडले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. तसेच त्याची नाळ काटेरी झुडपाला अडकलेली होती. त्यामुळे त्याला मोठा त्रास झाला असावा, असे डॉक्टरांनी सांगितले.


