नागपूर:- कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेड वाढविण्याची सूचना महापौर आणि महानगरपालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांना केली होती. जास्तीत जास्त रुग्णांना लवकर उपचार मिळावा, यासाठी महापालिकेचा हा प्रयत्न होता. पण पूर्णवेळ कोविड सेंटर तयार करण्याला खासगी डॉक्टरांनी नकार दिला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी महानगरपालिकेचे मनसुबे उधळल्याचे सध्यातरी दिसत आहे.
मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास सेवा देता येईल, असे महापौरांच्या बैठकीत सांगून हात वर करणाऱ्या खासगी डॉक्टरांनी आता रुग्णालयाचे पूर्णपणे कोविड सेंटर करण्यासही नकार दिला आहे. याबाबतचे पत्रच महापालिकेला दिले आहे. एवढेच नव्हे, तर शासकीय दराने उपचार करावे लागत असल्यामुळे मालमत्ता कर, विजेचा वाणिज्यिक दर आकारणे बंद करा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. महापौर संदीप जोशी यांनी ३ सप्टेंबरला खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वाढत्या बाधितांसाठी बेड उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. डॉक्टरांनी त्याच वेळी नकारात्मक भूमिका मांडली होती.
आता विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने महापालिकेला पत्र देऊन बळपूर्वक खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर करू नये. ते असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. शहरात बेडची कमतरता असल्याने बाधितांना उपचारासाठी महापालिकेने खासगी हॉस्पिटलकडून मदतीची जी अपेक्षा केली होती, त्याचा चांगलाच धक्का बसला आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांनी अनेक समस्या पुढे केल्या आहेत. यातील काही वैद्यकीय तथ्यांवर आधारित आहेत. मात्र, बहुसंख्या समस्या या हात झटकणाऱ्या आहे. दर दिवशी एका रुग्णासाठी एक पीपीई किट वापरण्याचे बंधनकारक करणे, हे रुग्णाच्या सेवेत अडथळा असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
आरोग्य विम्याची रक्कम मिळवण्यासाठी विमा कंपन्या अनेक शंका उपस्थित करीत असून रुग्णांनी पैसे द्यावे. त्यानंतर परताव्यासाठी दावा करावा अशी सुविधा हवी, असेही या पत्रात म्हटले आहे. खासगी रुग्णालये उत्तम सेवा देत असतानाच महापालिकेकडून होणारी सततची तपासणी, ऑडिट, कागदपत्रांची मागणी तसेच कारवाईची धमकी देणे बंद करावे, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. कोविड रुग्णांना उपचारासाठी दर निश्चित केले, त्याच पद्धतीने ऑक्सिजनच्या वाढत्या दरावर तसेच बायो मेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीसंदर्भातील वाढत्या दरावरही नियंत्रणाचा मुद्दाही खासगी रुग्णालयांनी पुढे केला आहे.
उपचारासाठी दर निश्चित केले, अशा स्थितीत रुग्णालयांनी वाणिज्यिक दराने मालमत्ता कर, विजेचे देयके का भरावी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. डॉक्टरांनाही हवे विम्याचे कवच शहरातील अनेक खासगी डॉक्टर उपचार करताना कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील काहींचा मृत्यूही झाला. शासकीय रुग्णालयांत सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरांनाही विम्याचे कवच देण्यात यावे, अशी मागणीही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिलेल्या पत्रातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- दोनशे रुपये वसूल करूनही लोक ऐकत नाहीत, अखेर या शहरासाठी गृहमंत्र्यांनी घेतलाहा निर्णय
- अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत; मुश्रीफ म्हणाले, मी गुरुवारी येतोय
- ऐन कोरोनाच्या काळात या आमदार महोदयांना हवाय जनता दरबार, काय आहे प्रकरण ?
- खाजगी रुग्णालयात 30 टक्के खाटा राखीव ठेवा, या मंत्र्यांचे यवतमाळ मध्ये आदेश
- मुख्यमंत्रीसाहेब कोट्यांनी शेतकऱ्यांचं पोट भरत नाही; अनिल बोंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

