Share

‘भ्रष्ट गंगोत्री साफ करणारे एकच शेषन निर्माण झाले, बाकी सब घोडे बारा टके !’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्यात पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संथ तपास कार्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर विरोधकांकडून देखील पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. यामध्ये आता पोलिसांच्या कामगिरीवर होणाऱ्या टीकेला आणखी दुजोरा देणारा घटना घडली. नागपूर शहर व नागपूर परिक्षेत्रातील कायद व सुव्यवस्थेचा आढावा घेत आसताना राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.

‘भ्रष्टाचार हा व्यवस्थेचाच भाग झाला आहे. पोलिस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या बघता अन्य विभागाच्या तुलनेत लाच प्रकरणात पोलिस विभागात अटक होणाऱ्यांची टक्केवारी ही कमीच आहे,’ या नगराळे यांच्या विधानाने उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. पत्रकारांशी संवाद साधताना भ्रष्टाचाराचा पुरस्कार करणे शक्यच नाही, असेही ते म्हणाले.

महसूल व पोलिस विभागात लाच घेण्याची स्पर्धाच असल्याचे आकडेवारी सांगते, याकडे लक्ष वेधले असता नगराळे म्हणाले, भ्रष्टाचार हा केवळ पोलिस, महसूल व वन विभागातच आहे असे नाही. भ्रष्टाचाराचा नायनाट करणे कठीण आहे. तो व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे. भ्रष्टाचाराऱ्यांना अटक करून त्यांना शिक्षा करणे हाच एकमेव पर्याय आहे. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून भ्रष्टाचार आणि राजकारणाचा देखील किती घनिष्ठ संबंध आहे. याची अनेक उदाहरणे देत राजकीय पक्ष आणि सरकारी यंत्रणा ही भ्रष्टाचाराशिवाय चालतच नसल्याचे म्हटले आहे.

‘भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा भाग बनला आहे, असे एक विधान राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. नगराळे यांचे विधान धक्कादायक, खळबळजनक आहे असे ज्यांना वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सहजपणे केलेले हे सत्यकथन आहे. नगराळे यांनी एक प्रकारे जनभावनाच व्यक्त केली. भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा भाग बनला आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. मात्र भ्रष्टाचार आज यंत्रणेचाच भाग बनला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला सरकारी यंत्रणेमधून खणून काढणे कठीण झाले आहे. आम्ही फक्त लाचलुचपत प्रतिबंधात्मक कारवाया वाढवून अधिकाऱ्यांना भ्रष्ट आचरणापासून दूर ठेवू शकतो, असे नगराळे म्हणतात.

नगराळे पुढे म्हणतात ते महत्त्वाचे. ”सरकारी यंत्रणेतून भ्रष्टाचार 100 टक्के दूर करता येऊ शकत नाही. म्हणूनच भ्रष्टाचार रोखण्यासाठी जो कायदा करण्यात आला आहे, तो कायदाही भ्रष्टाचाराला प्रतिबंध करा असे म्हणतो, पण भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करा, असे काही कायदा सांगत नाही,” असे हेमंत नगराळे म्हणतात. भ्रष्टाचार हा आपल्या जीवनाचा, राजकारणाचा एक भाग बनला आहे. पैशांनी आपण पृथ्वी आणि इंद्राचे दरबार विकत घेऊ शकतो, ईश्वर-अल्ला, सर्वांना विकत घेऊ शकतो असे मानणारे लोक आपल्या अवतीभवती आहेत, तोपर्यंत सर्वच पातळय़ांवरील भ्रष्टाचार संपेल हे मानण्यात अर्थ नाही. स्नानगृहात सारेच नंगे असतात हे त्यापैकी अनेकांचे समर्थन असू शकेल. पैसा हा राजकारणाचा, प्रशासनाचा भाग बनला आहे. मलईदार जागा मिळविण्यासाठी – ज्याला सोप्या भाषेत क्रीम पोस्टिंग म्हणतात, ते पदरात पाडून घेण्यासाठी -सत्ताधारी व अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे तयार होतात.

पैसे मोजून पदावर आलेला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी जी ‘राष्ट्रसेवा’ करतो ती थक्क करणारी असते. सिमेंटपासून मातीपर्यंत, पाण्यापासून प्राणवायूपर्यंत, धान्यापासून औषधांपर्यंत सगळय़ाच क्षेत्रांत भ्रष्टाचार होतो. टेबलावर पैसे घेणे हे टेबलाखालून घेण्यापेक्षा चांगले असे सांगण्याचा प्रयत्न होतो; परंतु शेवटी पैसे घेणे हे वाईट आहे, तो भ्रष्टाचार आहे या वस्तुस्थितीत बदल होत नाही हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. किंबहुना त्याकडे लोकांनी डोळेझाक करावी यासाठी अनेक जण दुसऱया हाताने खैरात चालू ठेवत असतात. म्हणजे लुटलेल्या पैशाचे वाटेकरी जनतेलाही बनवायचे. त्यामुळे पापाचे वाटेकरी होतात. या धोरणाने सगळे सुरू आहे. राजकारणात सध्या त्यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? भ्रष्टाचार मोडून काढण्याची आश्वासने देऊन जे सत्तेवर येतात, तेच नखशिखांत भ्रष्टाचारात बुडतात.

अण्णा हजारे यांनी दिल्लीत भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाने अण्णांच्या आंदोलनास सर्व प्रकारचे बळ दिले. आज अण्णाही कुठेच नाहीत व भाजप राष्ट्रात, राज्याराज्यांत सत्तेवर येऊन भ्रष्टाचार संपलेला नाही. ‘लोकपाल’ हवा, त्यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण राहील या अण्णांच्या मागणीस तेव्हा उघड पाठिंबा देणाऱया भाजपनेही ‘लोकपाल’ आणून भ्रष्टाचाराला वेसण घातली नाही. कारण भ्रष्टाचार हा शेवटी यंत्रणेचाच भाग असतो व सत्ता मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी, बहुमत विकत घेण्यासाठी भ्रष्टाचाराचाच पैसा लागतो. निवडणुका लढविण्यासाठी जे ‘बजेट’ तयार करावे लागते ते पाहिले की, सामान्य माणूस चक्रावून जाईल. बिहार व प. बंगालसारख्या राज्यांत सगळय़ांनीच पैशांचा पाऊस पाडला आहे. हा पैसा काही जमिनीतून उगवलेला नाही. लाखो कोटींचा काळा पैसा परदेशी बँकांत आहे. हा भ्रष्टाचाराचा पैसा पुन्हा देशात आणू असे सांगितले गेले, त्याचे पुढे काहीच झाले नाही.

भ्रष्टाचार हा सर्वव्यापी व चराचरांत भरलेला आहे. हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गेल्याच आठवडय़ात सांगितले की, न्यायालयात न्याय मिळत नाही. याचा अर्थ न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार आहे व तो त्या यंत्रणेचाच एक भाग आहे, पण ज्यांनी हे सांगितले त्या न्या. गोगोई यांनी निवृत्त होताच राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारले हासुद्धा भ्रष्टाचार आहे. छप्परच फाटले ते शिवायचे तरी कुठे? अशी अवस्था आज स्पष्ट दिसत आहे. सत्तेतून पैसा, पैशातून पुनः पुन्हा सत्ता या चक्रात आज सगळेच सापडले आहेत व पैसा जमविण्याचा मार्ग यंत्रणेतले अधिकारीच दाखवत असतात.

सार्वजनिक बँकांची लूट, चौथा स्तंभ मानणारे ‘मीडिया’ त्यांच्या टीआरपीसाठी कसा भ्रष्टाचार करतात हे समोर आले, पण या घोटाळेबाज लोकांना राजकीय पक्ष सरळ पाठिंबा देतात. गुंड व राजकीय कार्यकर्ते वर्गण्या गोळा करतात तेव्हा त्यांना खंडणीखोर म्हणतात; पण राजकारणी, अधिकारी व ठेकेदारांचे त्रिकूट एकत्र येऊन लूट करतात तेव्हा ती सोय म्हणून पाहिले जाते. निवडणूक हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे, असे श्री. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत. ही भ्रष्ट गंगोत्री साफ करणारे एकच शेषन निर्माण झाले. बाकी सब घोडे बारा टके! भ्रष्टाचार हा जगण्याचा आणि यंत्रणेचाच भाग झाला. तुम्ही-आम्ही काय करणार ? असा प्रश्न आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!