मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केलेली आहे. एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष आहे. उर्वरित राज्य वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकार फोल ठरल्याचंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपाचारासाठी उभी केलेली यंत्रणा बळकट करण्याऐवजी ती मोडून टाकण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आली तेव्हा उपचाराविना माणसं मेली, असे म्हणत कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं आंबेडकर यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य शासनाला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे. उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपात्कालीन समित्या बळकट करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देवून मदत करू शकतील, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार, महंगाई की मार ! घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार
- तौक्ते वादळ हे राष्ट्रीय वादळ, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये : अमोल मिटकरी
- औरंगाबादेत कोरोना रुग्णांसाठी गॅस दाहिनीचे काम वेगात!
- हुश्श… ! कोरोनाची दुसरी लाट लवकरच संपणार…
- असे चक्रीवादळ मुंबई पहिल्यांदाच अनुभवतीये ; आदित्य ठाकरेंनी घेतला कंट्रोल रुममधून आढावा

