मुंबई : महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याबद्दल आम्ही अत्यंत गंभीर आहोत. त्याबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४९ झाल्याचे ते म्हणाले. एक २२ वर्षांची लंडनहून आलेली युवती आणि दुबईवरून आलेला मुळचा अहमदनगरचा ५१ वर्षीय पुरूष असे दोन रुग्ण आढळल्याचे ते म्हणाले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाला रोखण्यासाठी विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रभावी पावले उचलण्यासाठी काल तीन महत्त्वाचे नवीन निर्णय घेतल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये ५० ऐवजी केवळ २५ प्रवासीच घेतले जातील. जेणेकरून त्यांची बसण्याची व्यवस्था अंतर ठेवून केली जाईल. सरकारी कार्यालयांमध्ये संबंधित विभागांच्या प्रमुखांनी, विभाग प्रमुखांनी तर मंत्रालयात सचिवांनी ठरवायचे की ५० टक्के रोटेशनप्रमाणे कुणाला उपस्थित राहायला सांगायचे, कुणाला सुट्टी द्यायची. यासंदर्भातला निर्णय त्या-त्या अधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या घरी सुरक्षित राहावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये हा यामागरचा उद्देश आहे. पुढचे १० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या आपण दुसऱ्या टप्प्यात आहोत. तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठीच या उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी ट्रेन्समध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी करू नये, कारण तिथे संसर्ग होण्याचा धोका असतो. मुख्यमंत्र्यांनीही वेळोवेळी याबाबत आवाहन केले आहे. लोकल्समध्ये उभे प्रवासी टाळता येतील का, त्याबद्दल काही करता येईल का, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ट्रेन बंद करणे हा शेवटचा पर्याय असेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनीही विनंती केली आहे की, लोकांनी घराबाहेर कमी पडावे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींकडूनही काही इन्पुट घेतलेत आणि त्यावर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज १२ देशांमधल्या विमानांना आपल्याकडे यायला पूर्णपणे बंदी घातलेली आहे. परंतु, हे १२ देश सोडून अनेकजण इतर देशांच्या माध्यमातून आपल्याकडे येत आहेत. त्यांच्यासाठी काही उपाययोजना करता येतील का, हे याठिकाणी पाहिले जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर योग्य तपासणी होतेय की नाही याबद्दल राजेश टोपे म्हणाले की, मी स्वतः विमानतळावर जाऊन याबाबतची पाहणी करणार आहे. संबंधित प्रवाशांचा मागील १५ दिवसांचा किंवा महिनाभराच्या प्रवासाचा इतिहास पाहिला पाहीजे आणि प्रवासी बाधित देशातून आला असल्यास त्याला क्वारंटाईन करणे अनिवार्य केलेच पाहीजे. अशाप्रकारचा दंडक आम्ही लावणार आहोत.
तसेच सर्व आवश्यक सूचना करणार आहोत. राज्यात इतरांचा संसर्ग झालेले १० रुग्ण आहेत. ५० पैकी ४० रुग्ण हे परदेशातूनच आलेले आहेत. हे लक्षात घेतले तर संसर्ग होण्याचे प्रमाण आपल्या राज्यात कमी असल्याचेच आढळून आले आहे. संसर्ग होण्याची संख्या थांबलीच पाहीजे. त्यासाठी विमानतळावरही सर्व सूचना पाळल्या जातील, या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. काल पुण्यातही आयुक्तांनी तपासणी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार तपासण्या केल्या जात आहेत. नागपूर, पुणे आणि मुंबई या तीनही आंतरराष्ट्रीय विमानतळावर यासंदर्भातील कडक उपाययोजना करू, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

