औरंगाबाद : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली असतानाच ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी आरक्षण बचावाची भूमिका घेत ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आरक्षण अबाधित राहावं व मेगा भरती लवकर घेण्यात यावी अशा मुद्द्यांसाठी रस्त्यावर उतरला होता.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीसह कुठल्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिली. त्यामुळेच माजी खासदार आणि ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी आज औरंगाबादमध्ये ओबीसी समाजाचा शेवटचा मोर्चा काढून मोठी घोषणा केली आहे.
ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं आश्वासन महाविकास आघाडी सरकारनं दिलं आहे. त्यामुळे हा मोर्चा सरकारचं आभार मानणारा असून यानंतरचे सर्व मोर्चे रद्द करण्यात आले आहेत.’ मधल्या काळात काही नेत्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बाधा येईल अशी वक्तव्ये केली होती त्यामुळेच आरक्षण अबाधित राहावं या मागणीसाठी ओबीसी समाज एकवटला होता.
‘अखिल भारतीय समता परिषद राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढत आहे. परंतु गेल्या आठवड्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होतं. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला थोडाही धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. त्याच बरोबर विरोधी पक्षानं देखील याबाबात सभागृहात बाजू मांडली. यासंदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आम्ही भेट घेतली. त्यांनी देखील आम्हाला शब्द दिला आहे. त्यामुळे यापुढचे सर्व मोर्चे आम्ही रद्द करतो,’ अशी भूमिका समीर भुजबळांनी स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्मवीरांच्या रयतमध्ये खळबळ; ‘त्या’ दोन पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांनी राजीनामा केला मंजूर
- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘या’ दिग्गज नेत्यांची नावं आघाडीवर
- बीड जिल्ह्यातील दोनशे शाळा कात टाकणार; मराठवाड्यासाठी २०० कोटी
- तृणमूल काँग्रेसला खिंडार; दिग्गज नेते सोडू लागले ममता बॅनर्जी यांची साथ
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार


