🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय भरती प्रक्रियेत ६५० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये एनटी – ड प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे २% आरक्षण देण्यात आले नाही. तसेच एनटी-क प्रवर्गातील उमेदवारांना केवळ २ च जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या जाहिरातीवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेऊन यातील त्रुटी लक्षात आणून दिल्या होत्या. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एमपीएससी परीक्षेची जाहिरात शेअर करत, पंकजा यांनी सरकारला लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. पंकजा यांच्या फेसबुक पोस्टची दखल घेऊन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, प्रकरणी एनटी- ड व एनटी – क प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी येत्या दोन दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच शासन निर्णयाप्रमाणे सदर दोन्ही प्रवर्गासाठी शासन निर्णयाप्रमाणे जागा आरक्षित करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी,अशी विनंती करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे.
काल (दि.२८) रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा -२०२० ची जाहिरात क्रमांक ०५/२०२० प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये राज्यसेवेतील विविध पदांसह पोलीस उपनिरीक्षक गट – ब या पदासाठी ६५० जागांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. या ६५० जागांपैकी ४७५ जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केलेल्या आहेत, शासन निर्णयाप्रमाणे यापैकी २% जागा एन टी – ड (भ ज – ड) प्रवर्गांसाठी आरक्षित असणे अभिप्रेत आहे, परंतु सदर प्रवर्गांसाठी एकही जागा या जाहिरातीत आरक्षित करण्यात आलेली नाही.
त्याचप्रमाणे एनटी – क (धनगर) प्रवर्गांसाठी आरक्षित जागांपैकी ३.५% जागा आरक्षित असायला हव्या होत्या परंतु या प्रवर्गांसाठी केवळ २ जागा देण्यात आल्या आहेत.या दोन्ही संवर्गातील अनेक विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास व भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची तयारी व अभ्यास करत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये आरक्षण डावलल्याप्रकरणी प्रचंड निराशा व संताप व्यक्त आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

