🕒 1 min read
मुंबई : राज्यात काँग्रेसने अधिक आक्रमक रूप धारण करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्या हाती सोपवली. महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे नाना पटोले यांच्याकडे गेल्यापासून त्यांनी देखील आक्रमक रूप घेतले आहे. तर, काँग्रेस आमदारांना-मंत्र्यांना कामासाठी मिळणारा निधी यावरून उघड नाराजी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नाराजी यासह येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा यामुळे महाविकास आघाडीतील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचं दिसून येत आहे.
अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल पुण्यात बोलताना उघड नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यासोबतच, ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग ताकद बनवा,’ असं म्हणत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात असून भाजपने नाना पटोले यांना लक्ष्य केलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘नानाजी काय तुमची अवस्था?’ असं म्हणत पटोलेंना खोचक टोला लगावला आहे. ‘नानाजी काय तुमची अवस्था? काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करीत आहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अजित पवार पाळत, फोन टॅप तरी कॅाग्रेस गप्प… ना सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असं चित्र आहे हे,’ असं म्हणत उपाध्ये यांनी पटोलेंना चिमटा काढला आहे.
@NANA_PATOLE नानाजी काय तुमची अवस्था? @INCIndia मुळे जे सत्तेत आहेत तेच प्रदेशाध्यक्षाविरोधात काम करीतआहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर @OfficeofUT @Dwalsepatil @AjitPawarSpeaks पाळत, फोनटॅप तरी कॅाग्रेस गप्प…
ना सत्तेत कॅाग्रेसला कोणी विचारत ना काँग्रेसमध्ये तुम्हालाअस चित्र आहे हे pic.twitter.com/y0fr6IS7HC— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 11, 2021
नेमकं काय म्हणाले होते पटोले ?
‘आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,’ असा टोला पटोलेंनी लगावला.
यासोबतच, ‘कोणत्याही समितीवर नावं पाठवायची असतील, तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास आहे, या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा. या त्रासाला आपली मानसिक कमजोरी बनवू नका. जो त्रास तुम्हाला आज मिळतोय… आमचा हिस्सा असतानाही आम्हाला देत नाहीत ना ठीक आहे. पण मी माझ्या कर्माने उद्याच्या काळात इथला पालकमंत्री बनेल… आमच्या पक्षाचा माणूस या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघालं पाहिजे. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे,’ असं रोखठोक भाष्य करत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी करण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादीने आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी’
- भाजपात काम करणाऱ्यांना डावलले जात आहे – उदय सामंत
- ‘माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील’ ; राठोडांचे सूचक विधान
- अन् केंद्राने ट्विटरला आणले वठणीवर ; ट्विटरकडून तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती
- ‘या’ अभिनेत्रीमुळे हर्षवर्धन कपूरच्या हातातुन निसटला हॉलिवूडपट, स्वत:च केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

