🕒 1 min read
औरंगाबाद: नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद महिला काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. दोन्ही शहराध्यक्षांना पदावरुन काढण्यात आले आहे. त्यामुळे महिला काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून या पार्श्वभूमीवर शहरातील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. पटोले यांनी महिला पदाधिकाऱ्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देत लवकरच निर्णय घेऊन न्याय देऊ अशी ग्वाही दिली. त्यानंतरच पदाधिकारी औरंगाबादेत परतल्या.
प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मात्र या नियुक्त्यांबाबत शहरातील सर्वच महिला पदाधिकारी नाराज झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी हेमा पाटील, तर शहराध्यक्षपदी अंजली वडजे यांची नियुक्ती झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष सीमा थोरात यांना कार्यकारी कमिटी सदस्यपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र याआधी त्यांच्याकडे शहराध्यक्षपद होते. पद भेटून आपल्याला केवळ एकच वर्ष उलटले होते. त्यामुळे आपला कार्यकाळ अजून संपलेला नाही. असे म्हणून थोरात यांनी नव्या नियुक्त्यांना विरोध करत नाना पटोले यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले आहे. मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत होते. असे असतांनाही आपल्याला पदावरुन का काढण्यात आले? असा सवाल त्यांनी पटोले यांच्यासमोर उपस्थित केला.
तसेच उज्वला दत्त यांनी सुशिक्षित महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती का केली नाही असा थेट सवाल या भेटीत उपस्थित केला. त्यांच्यासोबत शहरातून गेलेल्या इतर महिला पदाधिकाऱ्यांनीही पक्षाद्वारे करण्यात आलेल्या नव्या नियुक्त्यांना विरोध करत न्याय देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्ही सर्वजणी राजीनामा देऊ असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. यावेळी रेखा राऊत, परीघा खंडागळे, वैशाली तायडे, सरोज जेकब यांची उपस्थिती होती. नाना पटोले यांनी महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्याशी याबाबत बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांची तत्परता! ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले; पाहा व्हिडिओ
- महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले…
- “महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती

