औरंगाबाद : मालमत्ता कराची दहा लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले ६२७ मालमत्ताधारक निघाले आहेत. त्यांच्याकडे तब्बल दिडशे कोटी थकीत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षांत या मालमत्ताधारकांकडून महापालिका प्रशासनाला केवळ २ कोटीचा कर वसूल करण्यात यश आले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपण्याआधी महापालिकेला करापोटी मोठी कसरत करावी लागणार आहे.
औरंगाबाद शहरातील मालमत्ताधारकांकडे मालमत्ताकराचे ४६८ कोटी रुपये थकलेले आहे. मालमत्ताधारकांची संख्या २ लाख ५२ हजार इतकी असून त्यापैकी ३३ हजार मालमत्ताधारक हे व्यावसायिक आहेत. दरवर्षी मालमत्ता कराची वसुली शंभर टक्के होत नाही. त्यामुळे थकबाकीचा आकडा देखील दिवसेंदिवस फुगत चालला आहे. त्यातच दहा लाख रुपयांपेक्षा अधिक कर थकलेल्या मालमत्ताधारकांची संख्या ६२७ इतकी असलयाचे समोर आली आहे. या मालमत्ताधारकांकडे १४९ कोटी ३४ लाख ६५ हजार ८७९ रुपयांचा कर थकलेला आहे.
विशेष म्हणजे, तब्बल दहा लाखापर्यंत कराची थकबाकी होईपर्यंत पालिका शासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेला मालमत्ता करातूनच मोठे उत्पन्न मिळते. त्यावरच पालिकेचा गाडा चालविला जातो. शहरातील विकासकामे होतात. मात्र कराची वसुली होत नसल्यामुळे त्याचा विकास कामांवर परिणाम झाला आहे.
दरवर्षी शंभर कोटींचीच वसुली
दरवर्षी शंभर कोटींच्याच घरातच कराची वसुली होत आहे. दहा लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 627 मालमत्ताधारकांकडे एकूण थकबाकीच्या 30 टक्के म्हणजे दिडशे कोटी रुपये थकले आहे. शहरातील लाखभर कर थकलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली जात आहे. त्यामुळे आता या मालमत्ताधारकांवरही पालिका कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे
महत्वाच्या बातम्या

