नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे शांतनू सेन अधिवेशनाला मुकणार आहेत.
शांतनू सेन यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव पेगॅसस प्रकरणावर निवेदन देत असताना त्यांच्या हातातून निवेदनपत्र खेचून घेत फाडलं होतं. यानंतर भाजपाने शांतनू सेन यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. दरम्यान व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांचं निलंबन केलं आहे.
गुरुवारी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव मोबाइलमध्ये हेरगिरी करणाऱ्या पेगॅसस स्पायवेअरवर मोदी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांच्या हातातील निवेदन तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी हिसकावले आणि ते फाडून उपसभापती हरिवंश यांच्या दिशेने भिरकावले. त्यामुळे वैष्णव यांना आपलं निवेदन सभागृहाच्या पटलावर ठेवावं लागलं.
या प्रकारानंतर सभागृहाचे कामकाज तत्काळ स्थगित करण्यात आले; पण कामकाज तहकूब झाल्यानंतरही भाजपचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांदरम्यान तिखट शाब्दिक चकमक झडतच होती. या सर्व प्रकारावर आक्रमक झालेल्या अश्विनी वैष्णव यांनी पश्चिम बंगालमधील हिंसेची संस्कृती संसदेत आणण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केला जात असल्याचा आरोप केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- संकटात भर ; पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची राजनाथसिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा


