अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांचे पुतणे प्रबोधनकार ह.भ.प. रामदास महाराज कैकाडी ( जाधव) यांचे काल कोरोनामुळे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अहमदनगर जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. जिल्ह्यात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रामदास महाराज यांची संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची नितांत श्रध्दा होती. संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी याविषयी ते आपल्या किर्तनातून परखडपणे मत मांडत असत. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी तळमळीने काम केले. पंढरपुरच्या प्रसिद्ध कैकाडी मठाचे ते प्रमुख होते. अहमदनगर जिल्ह्यात रामदास महाराजांचे दरवर्षी अनेक कार्यक्रम होत. विविध संस्था त्यांना प्रवचन व कीर्तनासाठी बोलावत होत्या. राजकीय नेत्यांचेही त्यांचे चांगले संबंध होते. राजकारण करावे, पण त्याचा उद्देश केवळ समाजासाठीच असावा, असे ते कीर्तनातून सांगत. तसेच महाराष्ट्रातील राजकीय विषयांवर ते रोखठोक बोलत.
गरीब, अपंग, कुष्ठरोगी आणि निराधार लोकांच्या सेवेसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या मठामध्ये आजही अन्नदान सेवा सुरु आहे. त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अनेक वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रामदास महाराजांच्या निधनाबद्दल आ.संग्राम जगताप यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- कांद्याच्या निर्यात बंदीने पाकिस्तानचा आर्थिक फायदा; सामनातून मोदी सरकारवर सडकून टीका
- पैसासाठी अडवणूक करणार्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा, राजेश टोपेंची प्रतिक्रिया
- चक्क कोरोनाबाधित रुग्णच शिरला आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आणि मग…
- कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांना भविष्यात पश्चाताप होईल- राम शिंदे
- अहमदनगरमध्ये रुग्णांना बेड मिळेना; जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 हजारांवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

