जालना : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता विविध भागातील जालनेकर नागरिकांची खड्डेमय रस्त्यातून सुटका होणार आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी शासनाने निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्र्यांकडे सातत्याने लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने या मागणीची दखल घेऊन १० फेब्रुवारी रोजी जालना शहरातील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंटीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला जाणार असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शहरातील इतर रस्त्यांच्या कामासाठीदेखील निधी आवश्यक असल्याची बाब गोरंट्याल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उर्वरित रस्त्यांच्या कामासाठीही लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. उपलब्ध झालेल्या निधीतून उपरोक्त रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असून उर्वरित रस्त्यांची कामे निधी उपलब्ध झाल्यानंतर करण्यात येतील, असे जालना पालिकेकडून करण्यात आले आहे.
कोणत्या रस्त्यासाठी किती निधी?
शहरातील शिवाजी पुतळा ते गुरूबच्चन चौक ते आझाद मैदान या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी २५ लाख रुपये, शिवाजी महाराज पुतळा ते जिजामाता चौक ते अंबर हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी रुपये, मुर्गीतलाव पोलिस चौकी ते बाबूराव काळे चौक या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी रुपये, मंमादेवी ते रेल्वेस्टेशन रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी ७५ लाख असा १० कोटींचा निधी नगरविकास खात्याने मंजूर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
जलन्यातील सिडकोचे प्रकल्प रद्द करू नये; आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “वाल्मीची पुनर्रचना करून व्यवस्थापन जलसंपदा विभागाकडे द्यावे”
- मुलगा आणि पत्नीनेच दिली होती हत्येची सुपारी; एक वर्षानंतर झाला उलगडा
- “झांसे की रानी” चे पितळ उघडे पडले! महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता जनतेची माफी मागावी


