लंडन: कोट्यावधींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या किंगफिशर या मद्य कंपनी चा मालक विजय मल्ल्या ला भारतात परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप या प्रयत्नांना यश आलेलं नाही.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे की, फरारी दारू व्यावसायिका विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही.
ब्रिटनमध्ये या प्रकरणात काही गोपनीय कार्यवाही सुरू आहे, ज्यांची माहितीही भारताला देण्यात आलेली नाही. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात मल्ल्याविरूद्ध अवमान प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा खुलासा झाला.
खरं तर, सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याच्या वकिलाला कोर्टाचा अवमान केल्याच्या एका प्रकरणात विचारले की, मल्ल्या या प्रकरणात केव्हा येऊ शकतात. लंडनमधील प्रत्यर्पणाची कारवाई किती लांबणीवर पडली आहे. या प्रकरणात काय चालले आहे आणि प्रत्यार्पणात काय अडथळा आहे, हे खील कोर्टाला जाणून घ्यायचे होते.
मात्र आता आर्थिक चणचणीमुळे कोंडीत सापडलेल्या मल्ल्याने लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी 14 कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती त्याने या याचिकेतून कोर्टाला केली आहे. लंडनमध्ये मल्ल्याच्या बाजूने खटला लढवणाऱ्या वकिलाला त्याची फी मिळाली नाही. त्यामुळे या वकिलाने पुढच्या सुनावणीपर्यंत रकम न मिळाल्यास खटला लढणे बंद करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कर्जबुडवा उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यामागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे मल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे.
भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही निर्बंध आले असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मल्ल्याची सर्व संपत्ती लंडनच्या उच्च न्यायालयाने आपल्या निगराणीखाली ठेवली आहे. कोर्टात प्रकरण सुरू असेपर्यंत मल्ल्याला ही संपत्ती विकता येणार नाही किंवा त्याला ही संपत्ती तारण ठेवून कुणाकडूनही कर्ज घेता येणार नाही. त्यामुळे त्याची मोठी आर्थिक नाकेबंदी झाली आहे. मात्र, तरीही त्याची आर्थिक चणचण पाहून कोर्टाने त्याच्यावर दया दाखवत त्याला खटल्याची फि भरता यावी म्हणून त्याच्या खात्यातून 39 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी कोर्टाने त्याला एक दमडीही दिलेली नाही. आता या याप्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापराचे नियम 1 जानेवारीपासून बदलणार…
- बळीराजावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुढील दोन दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
- शेतकरी आंदोलन : वॉशिंग्टनमध्ये म. गांधींच्या पुतळ्याची विटंबना,खलिस्तानी झेंड्यानं झाकला चेहरा
- पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या मुलीच्या ‘त्या’ अफवांवरून नाराज
- शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

