मुंबई : देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपांवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
‘कोरोनाच्या या कठीण काळात गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने जनतेला आरोग्य सुविधा पुरवाव्या आणि आपले कर्तव्य पार पाडावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून आपल्या मंत्र्यांना अशा बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यापासून वेळीच थांबावे. त्यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केली. त्या गोष्टीचा आजही त्यांच्या मनात एवढा रोष आहे की, स्वतःच्या आणि आपल्या सरकारच्या प्रत्येक अपयशाचे खापर ते केंद्रावर किंवा अन्य अधिकाऱ्यांवर फोडतात.कोरोना काळात राजकारण नको, असे सल्ले देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी नवाब मालिकांना आवरावे. आज नवाब यांनी केंद्रावर केलेले आरोप हे अतिशय तथ्यहीन आणि निराधार आहेत. नवाब मलिक यांनी असे तथ्यहीन आणि निराधार आरोप करण्याऐवजी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी.’ अशा आशयाचे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लाल किल्ला हिंसाचार : दीप सिद्धूला जामीन मंजूर, ‘या’ अटींची करावी लागणार पूर्तता
- धक्कादायक : अवघ्या १५ दिवसात कोरोनाने अख्खं कुटुंब केले उद्ध्वस्त
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले : पियुष गोयल


