मुंबई : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटर्ससह बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील क्रेंद्र सरकारच्या बाजूने भूमिका दिसून आलं आहे.
आता, या कलाकारांच्या विर्धीत देखील कलाक्षेत्रातील एक गट आवाज उठवत आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी घेतलेल्या भूमिकेवर दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘शेतकरी आंदोलनाच्या धगधगत्या आगीवर इतर देशातील कलाकारांनी ट्विट केलं म्हणून त्यांना अक्कल शिकवणारा हा नट आपल्या देशातील महत्वाची व्यक्ती जेंव्हा इतर देशातील एखाद्या घटनेबद्दल ट्विट करून मत व्यक्त करते तेंव्हा अनुपम खेर ते वाचून का नाही टिव टिव करत?’ अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
सोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक ट्विट देखील जोडलं आहे. यात मोदींनी वॉशिंग्टन मधील स्थितीवर केलेलं भाष्य असल्याचं दिसून येत आहे. याचाच दाखल देत त्यांनी या कलाकारांवर निशाणा साधला आहे. ‘सिनेसृष्टीतील मुखवट्या मागचे खरे चेहरे आणि खायचे दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाही’ असा प्रहार देखील त्यांनी केला आहे.
महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट –
अनुपम खेर अब तेरी खैर नही
सिनेसृष्टीतील मुखवट्या मागचे खरे चेहरे आणि खायचे दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाही.संधी साधू असणारे आणि लोकांच्या प्रेमामुळे मोठे झालेल्या काही कलाकारांचे खरे रूप वेळोवेळी माझ्या पाहण्यात आले आहे. लोकांचं प्रेम मिळून लोकप्रिय यशस्वी झालेल्या या काही कलाकारांची अवस्था आपल्या राष्ट्रीय पक्षी मोरा सारखी असते. मोराला आपल्या पिसाऱ्यावर गर्व असतो,तो पिसारा फुलवून दाखवला की पाहणाऱ्यांच्या कडून कौतुक होते वाहवा मिळते म्हणून मोर खुश असतो.पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग (मागचा भाग) हा मात्र उघडा असतो हे सत्य आहे. काहीशी अशी अवस्था अनुपम खेर या नटाची आहे असं मला वाटतं.अर्थात अभिनेता म्हणून तो ग्रेटच आहे.
हा नट माझ्या मनातून पहिल्यांदा उतरला ते निळूभाऊ फुले यांच्या एका भेटी नंतर. निळू फुले यांनी अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेल्या सारांश या हिंदी सिनेमात काम केले होते.सारांश सिनेमाला 25 वर्ष झाली म्हणून एका कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते त्यासाठी निमंत्रण द्यायला अनुपम खेर पुण्यात निळू फुले यांना भेटले.त्यावेळी एका मोठ्या आजारामुळे निळू भाऊंची प्रकृती उत्तम नसल्यामुळे आणि शरीर साथ देत नसल्यामुळे ते घराबाहेर पडत नसत की कोणाला फारसे भेटत ही नव्हते.अनुपम खेर यांनी निळू भाऊंना भेटून काढलेले फोटो आणि बातम्या जेव्हां मुंबईच्या काही पेपर मध्ये आल्या त्या वाचून अनुपम खेर ने तापलेल्या तव्यावर किती भाकऱ्या भाजल्या ते समजले.फिल्म इंडस्ट्रीपासून अज्ञातवासात गेलेल्या ज्येष्ठ कलाकार निळू फुले यांना अनुपम खेर ने शोधून काढले अश्या आशयाच्या बातम्या आणि त्यात अनुपम खेर यांनी किती कसे कष्ट घेतले निळुभाऊंना शोधायला त्याचे रसभरून वर्णन होते.
अण्णा हजारे यांच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला अनुपम खेर स्टेजवर जाऊन भाषण ठोकताना पाहून हा किती मोठा कल्लाकार आहे ते समजलं. तिथे जमलेला अफाट जनसमुदाय,प्रेस मीडिया यांच्या समोर स्वतः ची लाल करून अण्णा हजारे बद्दल कळवळा दाखवणारा हा संवेदनशील कलाकार, दिल्लीत शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला किंवा साधं भेटायला जाण्याचं धाडस का दाखवत नाही? का तो आता एका पक्षाचा कुणीतरी आहे म्हणून सोयीप्रमाणे भूमिका बदलली याने?अण्णा हजारे यांना दिल्लीत जाऊन पाठिंबा देताना देशभरात अण्णांची हवा होती पण हीच हवा कालांतराने निघून गेल्यावर अनुपम खेर नंतर कधी अण्णांच्या वाऱ्याला ही उभा राहिला नाही की त्यांची भेट घ्यायला राळेगणसिद्धी गावी गेल्याचे ऐकिवात नाही.
आता मात्र शेतकरी आंदोलनाच्या धगधगत्या आगीवर इतर देशातील कलाकारांनी ट्विट केलं म्हणून त्यांना अक्कल शिकवणारा हा नट आपल्या देशातील महत्वाची व्यक्ती जेंव्हा इतर देशातील एखाद्या घटनेबद्दल ट्विट करून मत व्यक्त करते तेंव्हा अनुपम खेर ते वाचून का नाही टिव टिव करत? अनुपम खेर कलाकार म्हणून ग्रेट आहे पण माणूस म्हणून किती ….. आहे ते आता चांगलंच समजलं टीप:शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेचे समर्थन नाहीच.
https://www.facebook.com/mahesh.tilekar.5/posts/1939465732861318
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेच नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर देखील झाले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप
- किसान रेल अंतर्गत केंद्र सरकारकडून नवीन रेल्वे सुरू
- शहरात सलग तीन दिवस मराठा समाजाचे आंदोलन; पोलीस प्रशासनाची लागणार कसोटी
- जो सल्ला राज्य सरकारला दिला तोच सल्ला केंद्राला द्या; आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- हिंदुत्वाची मक्तेदारी भाजपाकडे नाही, मग तुम्ही हिंदुत्व का सोडलं? ; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

