अकोला : मराठा आरक्षणावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडून मराठा व ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षण व त्या अनुषंगाने पुकारण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर अकोल्यातील मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा महासंघाचे संस्थापक आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांचे पूत्र व माथाडी कामगार नेते तथा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील हे काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विदर्भात फिरत आहेत. आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी ते भेटीगाठी घेत आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण उच्च न्यायालयातही टिकले. मात्र, आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा आपल्या भूमिकेत बदल केल्याचा आरोप यांनी केला. आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय महाविकास आघाडी सरकारचे डोळे उघडणार नाहीत, असे नरेंद्र पाटील म्हणाले. मराठा समाज हा लढा लोकशाही पद्धतीने उभारणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमदारांना वाळूचे खड्डे का दाखविले’ म्हणत शिवसेनेच्या जि.प.सदस्याची एकाला मारहाण
- ‘त्या’ ३० नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या केली!, गिरीश महाजनांनी मौन सोडले
- वाढदिवसाची पार्टी केल्याने पोलिसांकडून सरप्राईझ! जमावासह ‘बर्थ डे बॉय’वर गुन्हा
- ‘विनायक मेटेंचा विरोध केवळ आमदारकी मिळवण्यासाठी’, अशोक चव्हाणांची टीका
- केरळमध्ये मुस्लिमांना ८० टक्के शिष्यवृत्तीचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द


