मुंबई : विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणूकीत महाविकास आघाडीकडून कमालीची सावधानता बाळगण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येते. मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा अध्यक्षपदाचे पद सध्या महाराष्ट्रात रिक्त आहे. अध्यक्षपदाची निवडणूक नागपूर अधिवेशनाच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी असलेल्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
विधिमंडळ कायदे समितीची बैठक नुकतीच झाली असून अधिवेशन कालावधीमध्ये यासंदर्भात प्रस्ताव आणून तो मंजूर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या नियमावलीनुसार जर विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घ्यायचे ठरले तर गोपनीय करावे असा नियम आहे. पण गोपनीय मतदानामध्ये दगाफटका होऊ शकतो हे लक्षात घेत मूळ कायद्यातच बदल करत नवीन खुल्या किंवा आवाजी मतदानानं मतदान घ्यावे असा कायदा करण्याचा विचार सुरू आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खुर्चीवर कोण विराजमान होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- पंतला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयला आली जाग, खेळाडुंना दिले ‘हे’ आदेश
- कोरोना लस घेतल्यानंतर परिणीतीची बिकट अवस्था; फोटो केला शेअर
- ‘दादा आणि नगमाच्या लव्ह स्टोरी बद्दल सगळं माहित आहे’ ; केआरकेने साधला गांगुलीवर निशाणा


