🕒 1 min read
ठाणे : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना, असं चित्र आहे. वादग्रस्त विधानाप्रकरणी १० दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ,’ असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला होता. मात्र तृप्ती देसाई यांनी इंदोरकीर यांच्याकडे माफी मागण्याचीच मागणी केली आहे.
तर दुसरीकडे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापिठात होणारा इंदुरीकर यांचा कार्यक्रमही अंधश्रद्धा निर्मुलन समितीने उधळून लावला आहे. हा घटना क्रम सुरु असतानाच आता इंदुरीकरांचा दुसरा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी यात चर्मकार समाजाबाबत अपमानास्पद विधान केले आहे. इंदुरीकर यांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले आहे, असा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. या संदर्भात चौकशी करुन दोन दिवसात अॅट्रोसिटी, संविधानाचा अवमान आणि मराठा समाजाला दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अंबोरे यांनी दिले आहे.


