मुंबई – काँग्रेसचे मुंबईतील माजी नेते तसेच राज्य सरकारमधील माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे.
कृपाशंकर सिंह यांनी जम्मू-काशमीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याला पक्षाने विरोध केल्याचे निमित्त साधून २०१९ मध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र तेव्हापासून ते कुठल्याही पक्षाशी संलग्न नव्हते. दरम्यान,शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपने गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून याचाच एक भाग म्हणून सिंह यांच्या पक्ष प्रवेशाकडे पाहिले जात आहे.
कृपाशंकर सिंग यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला मोठा फायदा होणार हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. मुंबईत उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत कृपाशंकर सिंग यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात मते भाजपच्या झोळीत जातील असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आपला इरादा स्पष्ट केला असून सिंह यांच्यासारखा अनुभवी नेता भाजपच्या गोटात गेला तर त्यांचा नक्कीच फायदा भाजपाला होणार आहे.
कोण आहेत कृपाशंकर सिंह ?
कृपाशंकर सिंह 1971ला उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून मुंबईला कामाच्या शोधात आले होते. कृपाशंकर सिंह यांचे वडील जौनपूरमधले स्वातंत्र्यसैनिक होते. मुंबईत आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांकरिता आवाज उठवला. स्थानिक पातळीवर ते त्यांच्यासाठी काम करायला लागले. काही दिवसांनंतर कृपाशंकर सिंह यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याचं म्हटलं जातं. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो.
काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंह हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंह यांनी भूषवली आहेत. पुढे कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला. आरोपानुसार, 1999 मध्ये आमदार बनल्यानंतर त्यांचं उत्पन्न प्रति महिना 45 हजार झालं. पण 1999 ते 2014 पर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती खरेदी केली. सुमारे 320 कोटींची संपत्ती त्यांच्या तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबईच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेब्रुवारी 2018 मध्ये विशेष कोर्टानं मात्र त्यांचं हे प्रकरण पुढे चालवू नये असं म्हटलं त्यामुळे हे प्रकरण मागे पडले.
महत्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
- राफेल व्यवहाराची चौकशी करण्याची कॉंग्रेसकडून वारंवार मागणी का केली जात आहे ?
- राज्यपालांच्या नेमणुका करताना सोशल इंजिनिअरिंगवर मोदी सरकारकडून दिले जातेय विशेष लक्ष
- अत्याधिक आक्रमकता भाजपला नडली; १२ आमदारांच्या निलंबनाचा भविष्यात बसू शकतो फटका
- विधीमंडळाच्या कामकाजात राजदंड एवढा महत्वाचा का असतो?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

