औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण गंभीर होत असून त्यांना व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनची गरज पडत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी केंद्राकडून जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २०० पैकी १५० व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी लोकप्रतिनिधींना दिली. त्यावरून भाजप विरुद्ध शिवेसना, एमआयएमचे खा. जलील यांच्यात खडाजंगी झाली. खा. जलील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. प्रशासनाने मध्यस्थी करीत माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने काही काळातच हा वाद निवळला.
जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाठ, उदयसिंह राजपूत, अंबादास दानवे यांच्यासह मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांण्डेय, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर इत्यादी उपस्थित होते.
केंद्र शासनाने औरंगाबाद जिल्ह्याला १५० व्हेंटिलेटर दिलेत. ते घाटीत ठेवले असून, अजूनही वापरात नाहीत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर बिनकामाचे असल्याची टीका खासदार इम्तियाज जलील यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत केली. त्यावर अामदार अतुल सावे यांनी इतर ठिकाणी पाठवलेले व्हेंटिलेटर वापरात असताना घाटीतच का बंद अाहेत, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी हा मुद्दा बैठकीत का उपस्थित केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
भाजप आ.सावे म्हणाले, केंद्राने राज्याला ११०० व्हेंटिलेटर दिले आहेत. इतर जिल्ह्यात चालू असताना घाटीला नेमकी अडचण काय आहे, केवळ केंद्राने पाठवले आहे म्हणून बदनामी करण्याचा प्रकार आहे. इतके दिवस व्हेंटिलेटर बंद होते तर लोकप्रतिनिधींना का सांगितले नाही, असे म्हणत घाटी आणि जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. यावर डाॅ. येळीकर म्हणाल्या, १५० पैकी ७५ व्हेंटिलेटर घाटीत असून ७५ इतर जिल्ह्यात पाठवले आहेत. ५० व्हेंटिलेटर इन्स्टॉल करणे बाकी असून २५ लावले आहेत. पण, त्यात अडचणी येत असल्याने वापर होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद जिल्ह्यात व्हेंटिलेटर बेड नसल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळेना. अन् असे असतांना केंद्राने निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर देऊन कोरोना रुग्णांची अप्रत्यक्षपणे खिल्लीच उडविली आहे. व्हेंटिलेटर बनविण्याचा कुठलाच अनुभव नसलेल्या दमणच्या कंपनीकडून केंद्राने हे व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. त्यामुळेच ते सतत नादुरूस्त होत आहेत. हा प्रकार गंभीर असून याविरोधात लोकसभेत चौकशीची मागणी करणार आहोत असे खा. इम्तियाज जलील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा, पीक विमा योजनेसाठी ‘बीड पॅटर्न’ राबवणार
- इच्छाशक्ती समोर कोरोनाही झुकतो; डॉक्टरांनीही आशा सोडलेल्या ९३ वर्षीय आजोबांनी जिंकून दाखवलं !
- दु:खद! मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन यांचे निधन, महिन्याभरापुर्वीच झाले होते कोरोनामुक्त
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला
- एबी डिव्हीलीयर्स नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडूही टी-२० विश्वचषकात करु शकतो पुनरागमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

