🕒 1 min read
नवी दिल्ली- आगामी सणासुदीच्या काळात कोविड संबंधीच्या नियमांचे पालन व्हावं याकडे काटेकोर लक्ष ठेवा असं गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केलं आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात कोविड योग्य वर्तनाचे काटेकोरपणे पालन केले जाणार नाही अशी शक्यता आहे. मेळावे, सण ,धार्मिक कार्यक्रमांमुळे रुग्णवाढ होऊ शकते. त्यामुळे रुग्णसंख्येमधील वाढ टाळण्यासाठी काटेकोर दक्षता राखावी अशा सूचना गृह सचिव अजय भल्ला यांनी दिल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढीच्या दरावर बारीक लक्ष ठेवावे, ज्या राज्यांमधील जिल्ह्यांमध्ये वाढीचा दर अधिक आहे त्या ठिकाणी प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ‘चाचणी- रुग्णशोध – उपचार – लसीकरण आणि कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याच्या पंचसूत्री वर लक्ष केंद्रित करावं असं गृह मंत्रालयाने सूचित केलं आहे.
दरम्यान, एका बाजूला हे पत्र आले असतान दुसऱ्या बाजूला लसीकरण मोहीम देखील जोरात सुरु आहे. देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत लसींच्या 87 कोटी 7 लाखांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. काल एका दिवसात 1 कोटी 2 लाख 22 हजार मात्रा देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 .81 टक्के झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यानंतरचा सर्वाधिक दर असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. काल 26 हजारांहून जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 3 कोटी 29 लाख 58 हजार 2 वर पोहोचली आहे.देशात कोविड 19 मुळे दगावलेल्यांची संख्या 4 लाख 47 हजार 373 इतकी असून आज सकाळी संपलेल्या 24 तासात 179 रुग्णांच्या कोविड 19 मुळे मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाला पडला चांगलाच महागात
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही – चरणजीतसिंग चन्नी


