ब्रिस्बेन : मोहम्मद सिराज हे नाव २ महिन्यांपूर्वी फारशा लोकांना माहित देखील नसेल पण भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात कमाल केली आणि सिराजच नाव जगभरातील क्रिकेट रसिकांच्या ओठावर आल. पठ्ठ्याने कामचं तसं केलं आहे. भारतीय संघानं २-१ ने मालिका जिंकली आणि यात मोहम्मद सिराजनं भारताकडून १३ विकेट्स घेतल्या. आणि या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला.
आपल्या मुलानं देशासाठी क्रिकेट खेळावं ही इच्छा उराशी बाळगलेले मोहम्मद सिराजचे वडील त्यांचं स्वप्न पूर्ण होताना पाहण्याआधीच हे जग सोडून गेले. आज जर ते हयात असते तर त्यांना आपल्या मुलानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक बळी घेतले याचा नक्कीच अभिमान वाटला असता. सिराजच्या वडिलांचं २० नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. याच्या एक आठवड्यापूर्वीच सिराज ऑस्ट्रेलियात पोहोचला होता आणि कोरोनाच्या नियमांमुळे सिराजला त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहता आलं नाही. मोहम्मद सिराजने मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण केलं. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीत पाच विकेट्स घेऊन भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला.
सिराजसाठी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये सिराज त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज नसल्यामुळे अनवाणी पायांनीच गोलंदाजी करत होता. येत्या मार्च महिन्यात सिराज वयाची २७ वर्ष पूर्ण करतोय. सिराज एका सामान्य कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतो. त्याचे वडील एक ऑटोरिक्षा ड्रायव्हर होते. तर सिराजचा भाऊ त्याच्या वडिलांना कामात मदत करत असे.
सिराजच्या आयुष्यात आजवर अनेक अडथळे आलेत. आर्थिक चणचण असतानाही त्याचे वडिल त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्याला क्रिकेट खेळू दिलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच मोहम्मद सिराजनं आपल्या वडिलांना गमवलं आणि त्याला मोठा धक्काच बसला होता. बीसीसीआयनं सिराजला माघारी परतण्याचा पर्याय दिला होता. पण सिराजनं भारतीय संघासोबतच राहणं पसंत केलं. तेव्हा सिराजनं भरलेल्या मनानं काळजावर दगड ठेवून म्हटलं होतं की, ‘माझे वडील मला सर्वात जास्त पाठिंबा देत आले आहेत. ही माझ्यासाठी सर्वात मोठी परीक्षा आहे. त्यांचंच स्वप्न होतं की मी भारतासाठी क्रिकेट खेळावं आणि देशाचं नाव मोठं करावं’
सिराजचा संघर्ष इथेच थांबला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काही प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. कसोटी सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याबाबत ही घडना घडली होती. सामन्यातील चौथ्या दिवशी जेव्हा असा प्रकार घडला तेव्हा भारतीय संघ व्यवस्थापनाने याची अधिकृत तक्रार केली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा असा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी मोहम्मद सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. सिराजला ब्राउन डॉग आणि बिग मंकी असे शब्द वापरले गेले. हे दोन्ही शब्द वर्णद्वेषी मानले जातात. ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी बुमराहला देखील असेच शब्द वापरले. पण सिराज डगमगला नाही तर त्याने आपल्या धमाकेदार प्रदर्शनातून ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे ‘थोबाड’ कायमचे बंद केले.
सिराजने आजवर कोणतीच अधिकृत क्रिकेट कोचिंग घेतलेली नाही. सुरुवातीच्या काळात सिराज त्याच्या घराजवळच्या मैदानात टेनिस बॉलने सराव करायचा. सिराजच्या मित्रांचंही त्याच्या आजवरच्या यशात मोठं योगदान राहीलं आहे. मोहम्मद सिराजला सुरुवातीला एक चांगला फलंदाज व्हायचं होतं, असं त्याचा मित्र अमजद खान सांगतो. पण सिराजकडून चांगली गोलंदाजी होऊ लागली. तो गोलंदाजीच खूप चांगली कामगिरी करू लागला आणि त्याला मिळणाऱ्या यशानं आम्हाला अभिमान वाटू लागला, असंही अमजद पुढे म्हणाला. सिराजने २०१५-१६ मध्ये हैदराबादकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर विजय हजारे करंडकमध्येही तो खेळला. सिराजने हैदराबादच्या अंडर-२३ संघाकडूनही गोलंदाजी केली आहे. आयपीएलमध्ये सिराज सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. याआधी तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता.
महत्वाच्या बातम्या
- तुळजापूरच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ
- संसद उपाहारगृहाचे अनुदान बंद ! खासदारांना स्वस्तात जेवण मिळणार नाही
- दारुबंदीसाठी मातांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- शेतकऱ्यांच्या जीव देण्याला सरकार जबाबदार नाही; कर्नाटकच्या कृषिमंत्र्यांनी तोडले अक्कलेचे तारे !
- वीज बिल भरलं नाहीत तर वीज तोडण्याचा निर्णय हा तुघलकी, वीज तोडण्याच्या निर्णयावरून मनसे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

