मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली आहे. या बंदमध्ये सहभागी होऊन अन्नदात्यांचे ऋण फेडण्याचे आवाहन शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, ‘लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबद्दल ज्या असंख्य लोकांना वरुण गांधींप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करता आल्या नाहीत, अशा सगळ्यांसाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य ठामपणे उभा आहे. बांधावर जाऊन शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवायचा, पण चार शेतकऱ्यांना भाजपच्याच मंत्रिपुत्राने चिरडून मारले त्या कृत्याचा साधा निषेधही करायचा नाही, अशी राज्याच्या विरोधी पक्षाच्या वागण्याची तऱ्हा आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा हा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे.’
‘देशभरात नवरात्री जागवल्या जात आहेत. कोरोना काळात धार्मिक उत्सव, सण साजरे करण्यावर कठोर निर्बंध सुरू आहेत, पण शेतकऱ्यांवरील अन्यायावर कोणतेच निर्बंध दिसत नाहीत. बेबंद, बेफामपणे शेतकऱ्यांना चिरडणे-भरडणे आणि ठार मारणं सुरुच आहे. खीमपूरात मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ चा पुकार केला आहे.’
‘शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारा आहे. इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण केलं पाहिजे. लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे असे ‘सामना’ अग्रलेखात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवार आता जास्त दिवस बाहेर राहणार नाहीत; निलेश राणेंचा दावा
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल


