🕒 1 min read
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा राज्यसभेला संबोधित केले. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला. हे चारही सदस्य जम्मू काश्मिरचं प्रतिनिधित्व करत आहेत.
यावेळी मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘पद, सत्ता जीवनात येत जात राहते. मात्र, ती कशी पचवावी हे आझाद यांच्याकडून शिकावे’, असे म्हणत मोदींनी सदनात त्यांना सलाम केला.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पवार यांनी आझाद यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. एकवेळी आझाद यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना खुद्द पवारांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. मात्र, तरी देखील आझाद बहुमताने निवडून आले होते. याबाबतही पवारांनी फेसबुक पोस्ट मध्ये खुलासा केला आहे.
वाचा शरद पवार यांची फेसबुक पोस्ट –
अनेक वर्षांपासून आपले सहकारी असलेले मीर मोहम्मद फय्याज, शमशेर सिंग, नादिर अहमद आणि गुलाम नबी आझाद या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. हे सदस्य जम्मू-काश्मीरमधून येतात. संसदेत आल्यानंतर त्यांनी नेहमीच जम्मू-काश्मीर व उर्वरित भारताचे संबंध चांगले राहतील यावर भर दिला.
गुलाम नबी आझाद यांच्यासोबत काम करण्याची संधी मला अनेक वर्षे मिळाली. राजकारणाची सुरुवात त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेपासून केली. जम्मू-काश्मीरमध्ये युवक संघटनेचे काम केले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे संघटनकौशल्य बघून राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
त्यानंतर त्यांनी नव्या पिढीला संघटित करण्याचे काम केले. १९८२ हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील कायम स्मरणात राहील असे आहे. एकतर यावर्षी त्यांचे लग्न झाले. याच वर्षी महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम अशा वाशिम जिल्ह्यातून निवडणूक लढविण्याची संधी काँग्रेसने त्यांना दिली.
मी त्यावेळी विरोधी पक्षात होतो. काश्मीरहून आलेल्यांना आपण इथून जिंकू देऊ नये, असा प्रचार मी त्यावेळी केला होता. तरीही गुलाम नबी आझाद मोठ्या मताधिक्यांने निवडून आले. वाशिमच्या जनतेचा विश्वास संपादित करून वाशिमचा चेहरामोहरा कसा बदलेल यावर त्यांनी काम केले.
सिंचन, शिक्षण या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. काश्मीरहून आलेला एक नेता वाशिमचा लोकप्रतिनिधी बनला, तिथल्या विकासासाठी झटला; त्यामुळेच वाशिमचे लोक आजही त्यांची आठवण काढतात. फक्त वाशिमच नाही तर आझाद यांनी संपूर्ण विदर्भाच्या विकासासाठी आपले योगदान त्यावेळी दिले होते.
मा. प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आझाद यांनी अनेक वर्ष संसदेत काढली आहेत. मला वाटतं की या सरकारमध्ये जेवढे विभाग आहेत, त्या सर्वांमध्ये काम करण्याची संधी लाभलेले गुलाम नबी आझाद हे एकमात्र सदस्य असतील. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचा विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केले.
राजकारणात संघर्ष होत असतात मात्र व्यक्तिगत सलोखा जपण्याचे काम गुलाम नबी यांनी केले. संसदीय कार्यमंत्री असताना सर्व विरोधी सदस्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. अधिवेशनच्या प्रत्येक दिवशी विरोधी सदस्यांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या ते जाणून घ्यायचे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे.
संसदीय कार्यमंत्री म्हणून सर्व सदस्यांचा विश्वास जिंकण्याचे काम गुलाम नबी यांनी केले. मी तरी माझ्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत असे काम केलेला दुसरा नेता पाहिला नाही. पुढील आठवड्यापासून त्यांचा कार्यकाळ संपत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आज ना उद्या काश्मीरमध्ये पुन्हा निवडणूक होऊन त्यांना संसदेत येण्याची पुन्हा संधी मिळेल.
गुलाम नबी यांच्या अनुभवाची, त्यांच्या देशाप्रती असलेल्या प्रेमाची प्रचीती आपल्याला पुन्हा येईल. गुलाम नबी आझाद आपण जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून, काँग्रेस नेताआणि राज्यसभा सदस्य म्हणून जे योगदान दिले, ते आम्ही कधीही विसरू शकत नाही.
https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/3881368565218088/
महत्वाच्या बातम्या
- मायदेशातील पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक दणका !
- ‘राजकीय कुरघोडीसाठी इतका करंटेपणा कुठून येत असेल?’
- जयसिद्धेश्वर यांच्या अडचणीत वाढ; खासदारकी धोक्यात !
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- ट्विटरला दणका देणारे स्वदेशी ‘Koo’ ऍप नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
