पुणे – देशावर जेव्हा संकटे आली, त्या-त्या वेळी संघानेच पुढाकार घेऊन याचा मुकाबला करुन देशाला संकटातून बाहेर काढले. कोरोनाच्या संकटातही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक कोविड योद्ध्यांसोबत जीव पणाला लावून काम करत आहेत. तरीही गृहमंत्री संघावर टीका करत आहेत. संघ राष्ट्रद्रोही संघटना आहे का, असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारला.
क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी पुण्यातील नागरिकांच्या RTPCR आणि रॅपिड अॅंटीजेन चाचण्या करण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. त्या व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्यात पाटील बोलत होते. यावेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, रा. स्व. संघाचे महानगर कार्यवाह महेशराव कर्पे, पुणे मनपा सभागृह नेते गणेश बीडकर, पुणे शहर भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर, प्रतिक देसरडा, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा संघच पुढे आला. संकटसमयी संघच नेहमी धावून येतो. कोविडच्या काळातही अन्नधान्य वाटप, गोर-गरीब कुटुंबांना भोजन व्यवस्था, कोविड बाधितांसाठी केअर सेंटर सुरू करणे, एवढेच नाही; तर अंत्यविधीसाठी देखील संघ स्वयंसेवक पुढे येऊन काम करत आहेत. पण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मध्यंतरी म्हणाले होते की, पोलीस सेवेतील संघ स्वयंसेवकांना आम्ही शोधून काढू. संघ काही दहशतवादी संघटना आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, कोविडच्या संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. हरभजनसिंह, सुधीर मेहता हे त्यापैकी एक आहेत. या दानशूर व्यक्तींनी कोविडच्या संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी जो आर्थिक डोंगर उचलावा लागणार आहे, तो उचलण्याची ठरवलं आहे. त्यामुळे आपला देश नक्की या संकटातून बाहेर पडेल.
पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, पुणे शहर कोरोना मुक्त करण्याचा भाजपाचा निर्धार असून, यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि रा. स्व. संघाचे कार्यकर्ते प्रशासनाच्या हातात हात घालून काम करत आहेत. यासाठी कोविड टेस्टिंगची ही व्हॅन अतिशय महत्त्वाचे आहे.लोकार्पण झालेल्या व्हॅनच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचण्या 500 रुपयात आणि रॅपिड अॅंटीजेन चाचण्या 250 रुपयात करण्यात येणार आहेत. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील व्यक्तींची मोफत टेस्ट करण्यात येणार आहे. दररोज दीड हजार आरटीपीसीआर आणि सहा हजार अँटिजेन टेस्ट या लॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील गरीब जनतेला मोफत लस मिळणार का ? अजित पवार म्हणाले…
- कंगनाने ट्विट करून केले पाकिस्तानचे कौतुक, म्हणाली…
- …म्हणून अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे; जयंत पाटील यांचा अजब दावा
- राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार – अजित पवार
- ‘सर्वांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अखंड कार्यरत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

