मुंबई : भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या 2014 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 41 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 169 लोक ठीक झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की, 24 तासांमध्ये 386 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिकी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. कोरोनाच्या संकाटात गरीबांच्या मदतीसाठी किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज यांनी १ लाखांची मदत केली आहे. संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्त केला आहे. इंदुरीकर महाराज हे आपल्या किर्तनामुळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
इंदुरीकर महाराज यांनी याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. २२ मार्चला जनता कर्फ्यूच्या दिवशी त्यांनी, ‘मी घरीच राहणार आहे, तुम्हीही घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं होतं.’
‘आपलं गाव, आपलं शहर, आपला देश कोरोना मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणे गरजेचं आहे. हा लढा कोणाही एकट्या दुकट्याचा आणि निव्वळ शासन प्रशासनाचा नाही, तर सर्वांचा लढा आहे. तेव्हा खबरदारी घ्या. सुचनांचे कोटेकोरपणे पालन करा. प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूपासून दूर ठेवा. असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या. शासनाला सहकार्य करा.’ असंही इंदुरीकरांनी आवाहन केलं.


