पंढरपूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे. राज्य सरकार कडक लॉकडाऊन लावण्यावर ठाम आहे. मात्र अशात लोकप्रतिनिधी कोरोनाचे सर्व नियम सर्रास पायदळी तुडवत आहेत.
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.
ही निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे बडे नेते प्रचारासाठी मोठ्या-मोठ्या जाहीर सभा घेत आहेत. मात्र जनतेला कोरोनाचे नियम पाळण्याचे ब्रम्हज्ञान शिकवणारे नेते कसे कोरडे पाषाण आहेत हे स्वतःच्या कृतीतून जगजाहीर करत आहेत. आज ( १२ एप्रिल ) विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस पंढरपूर-मंगळवेढा येथे प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीस यांनी नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे जाहीर सभा घेतली. या सभेला भाजप कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. या गर्दीत कोरोनाच्या नियमांना तिलांजली दिली गेली. उठसुठ राज्य सरकारवर बोट उचलणारे आणि कोरोना नियम पाळले नाही म्हणून कारवाई करण्याची मागणी करणारे भाजप नेते आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोरोनाचे नियम मोडले म्हणून कारवाई करण्याची मागणी करणार का ? हा खरा प्रश्न आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तौबा गर्दी जमवत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती. यामुळे कोरोना नियमांचा भंग झाला होता. याप्रकरणी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188 नुसार पंढरपूर शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला. तोच नियम आता फडणवीस यांच्या सभेला लागू होणार का ? याकडे लक्ष लागले आहे.
आता प्रश्न असा आहे की अजित पवार असो की देवेंद्र फडणवीस हे जनतेला नियम पाळण्याची अक्कल शिकवत असताना स्वतःच्या सभेत जमलेले गर्दी पाहून आत्मपरीक्षण करणार की राजकारणासाठी ‘निर्लज्जम् सदा सुखी’ हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून कोरोना नियम सर्रास पायदळी तुडवणार ? एक मात्र नक्की नियम मोडणारे पवार असो किंवा फडणवीस यांच्याकडे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे.
महत्वाच्या बातम्या
- समदची फलंदाजी पाहून इरफान पठाण पण झाला होता अवाक
- ‘सत्यशोधक’द्वारे महात्मा जोतीराव फुले यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर
- बप्पी लहरी यांची प्रकृती स्थिर ; हॉस्पिटल मधून मिळाला डिस्चार्ज!
- जर चैत्यभूमीचा स्तूप कोसळला तर देशभरातील आंबेडकरी जनतेचा उद्रेक होईल; आठवलेंचा सरकारला इशारा
- दारुड्या भावाला वैतागून पोलिसांना सांगितले त्याचा खून झाला आणि..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

