🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आल्याने नागरिक घराबाहेर पडून लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र लसींच्या तुटवड्याअभावी शहरात लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत आहे. मंगळवारी (दि.६) सकाळपासूनच हर्सूल येथील मनपाच्या लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र १२ वाजले तरीही लसीकरण सुरु न झाल्याने याठिकाणी नागरिक हमरीतुमरीवर उतरले. नंबरवरुन याठिकाणी नागरिकांची बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दिडशे लसी प्रत्येक केंद्रांवर वितरीत केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी समजुतीने घ्यावे आणि मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.
सोमवारी जिल्ह्याला २६ हजारांचा साठा प्राप्त झाला. यातून केवळ १० हजार लसी मनपास देण्यात आल्या आहेत. मात्र हा साठा एकाच दिवसात संपेल. त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पाच गिरवावे लागणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात आली आहे. औरंगाबादकरांकडून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र वारंवार लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे.
गेल्या आठवड्याभरात केवळ दोन ते तीनच दिवस लसीकरण सुरु होते. आत्तापर्यंत १५ हजार, १२ हजार या प्रमाणात लसींचा पुरवठा झाला. मात्र लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दोनच दिवसात हा साठा संपत आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी किमान ७० टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी यापूर्वीच म्हटले आहे. मात्र जोपर्यंत जास्तीचा साठा मनपास प्राप्त होत नाही तोपर्यंत ७० टक्के लसीकरण होणे अशक्यप्रायच आहे.
नागरिकांची गर्दी, या गर्दीतून संसर्ग पसरणार नाही का?
लसींचा साठा प्राप्त झाल्याने मनपाने आजपासून ३९ केंद्रांवर लसीकरण सुरू केले आहे. प्रत्येक केंद्रात दिडशे लसी देण्यात आल्या आहेत. मात्र सकाळपासूनच शहरातील या केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी होत आहे. यातील हर्सूल आणि जय भवानी नगर केंद्रात तर नागरिक हमरीतुमरीवर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावर मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पाडळकर यांनी नागरिकांना सबुरीने घेण्याचे आवाहन करत जेष्ठांना, दुसऱ्या डोसवाल्यांना प्राधान्य देण्याची विनंती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्ड’ ; फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘आर्यन मॅनने मॅसेजची दखल न घेतल्याने नाराज होते’ तापसी पन्नू
- ‘माझ्यावर आरोप म्हणजे राज्य सरकारवर आरोप, मला क्लीनचिट द्या’; सरनाईकांची मागणी
- टी-20 विश्वकरंडक स्पर्धेमध्ये स्थान मिळवण्यासाठी लक्ष्मणने दिला शिखरला मोलाचा सल्ला
- ‘विराट आणि रवी शास्त्री यांनी खेळाडूंच्या पाठिशी उभं राहायला हवं’ ; कपिल देव यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
