औरंगाबाद : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सध्या चांगलेच अडचणीत दिसत आहेत. काही दिवसांपासून शांत असलेल्या करुणा शर्मा यांनी परळीत येऊन अन्यायाला वाचा फोडणार आणि अनेकांची पोलखोल करण्याचा इशारा दिला होता. ठरल्याप्रमाणे त्या ५ सप्टेंबर रोजी परळीत आल्याही. मात्र, त्यांचे अनपेक्षित स्वागत झाले. सध्या त्यांचा पाहूणचार न्यायालयीन कोठडीत सुरू आहे. वैद्यनाथ मंदिरासमोर महिलांच्या संतापाला सामोरे जाणे, गाडीत बंदूक सापडणे, एट्रॉसिटी प्रकरण इत्यादी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग कोठेच नव्हता. मात्र, परळीत माझ्याशिवाय पानही हलत नाही असा दावा करणारे धनंजय मुंडे यांना या गोष्टीची पूर्वकल्पना नसेल यावर विश्वास ठेवणे जरा अवघडच आहे.
हाच मुद्दा हेरून अनेक वृ्त्तमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केले. करुणा शर्मा यांच्या दोन्ही बाजू जाणून घेत पारदर्शी पत्रकारिता माध्यमांनी केली. त्यात काही ठिकाणी पोलिसांची संशयास्पद भूमिका जाणवली. तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘अप्रत्यक्ष हाता’मुळे ही कारवाई झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्याबद्दलही माध्यमांनी लिहिले.
मात्र, सतत वाहवा ऐकण्याची सवय असलेल्या धनंजय मुंडे यांना ही गोष्ट सहन झाली नसावी. त्यामुळे त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जाणे किंवा त्यांना उत्तरे देण्याऐवजी एक शॉर्टकटचा मार्ग अवलंबवला आहे. तो म्हणजे थेट ब्लॉक करणे. सोशल मीडियावर कोणी आपल्याविरोधात जात आहे कळू नये याकरिता धनंजय मुंडे अनेकांना ब्लॉक करत सुटले आहे. शिवाय विरोधात लिखाण करणारे वृ्त्तपत्र, पत्रकार यांना भेटी टाळणे, ठराविक वृत्तवाहिन्यांनाच प्रतिक्रिया देणे यावरून धनंजय मुंडे यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट होत आहे.
अजित पवारांचा समर्थक असा असू शकतो?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा स्वभाव सर्वांनाच माहितेय. दादांच्या कार्यपद्धतीमुळे माध्यमांना अनेकदा नव्हे तर वांरवार अजित पवारांच्या विरोधात जाऊन बातम्या प्रकाशित कराव्या लागल्या. वादग्रस्त वक्तव्य असो वा इतर कोणतेही कारण, माध्यमांनी आपले कर्तव्य बजावलेच. मात्र, आजवर कधीही अजित पवारांनी माध्यमांवर डुख धरला नाही की कधी त्यांच्यापासून दूर गेले नाही. उलट निर्भिडपणे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पण त्यांचे समर्थक असलेले धनंजय मुंडे यांच्यासारखे नेते माध्यमांना थेट ब्लॉक करत असतील तर पक्षश्रेष्ठींसमोर काय संदेश जाईल हा देखील एक प्रश्नच आहे.
‘महाराष्ट्र देशा’ची रोखठोक भूमिका
घटना का, कशी, केव्हा, कुठे, कधी घडली याची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हे वृत्तमाध्यमांचे काम आहे. आणि त्या घटनेचे विश्लेषण करून ती घटना का घडली, त्याला कारणीभूत कोण आहे, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, त्यातून कोणाचा फायदा अन् कोणाचे नुकसान होत आहे, त्याचा समाजावर कितपत परिणाम होतोय, त्या घटनेतून कायद्याचे तत्त्व पाळले जात आहेत का इत्यादी गोष्टींची मिंमासा करणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे. याच तत्त्वाचे पालन ‘महाराष्ट्र देशा’ सुरुवातीपासून करत आहे.
‘महाराष्ट्र देशा’ने करुणा शर्मा प्रकरणावर पहिल्यापासून परखड आणि रोखठोक भाष्य केले आहे. सर्व बाजुंचा सविस्तर अभ्यास करून आपल्या बातम्यांमधून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ‘महाराष्ट्र देशा’ची ही भूमिका कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कदाचित आवडली नसावी अथवा वास्तव पचवणे जड जात असावे म्हणून धनंजय मुंडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला ट्विटरवर ब्लॉक केले आहे. शिवाय अनेक डिजिटल माध्यमांकडेही धनंजय यांनी पाठ फिरवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरवेळेस आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी कधी तरी हळहळ व्यक्त करा’, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल
- ‘फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’
- साकीनाका घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, सुमोटो दाखल करत पोलिसांना लिहिले पत्र
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- ‘काहीतरी करायचंय म्हणून कार्यालय हलवू नका’, भुजबळांचा मंत्री कराडांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

