मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. तर, ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये बिघाड होऊन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. नाशिक पाठोपाठ ठाण्यात देखील ऑक्सिजन प्रेशर नियंत्रणात नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे आता दुर्घटना टाळण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं पाऊल उचललं आहे. ‘राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणीत कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करणेबाबत सूचना दिल्या आहेत,’ असं टोपे म्हणाले आहेत.
यासोबतच, ऑक्सिजन, रेमडीसीवीर उलब्धतेसाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे ४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १३२ पीएसए, २७ ऑक्सिजन टॅंक, २५ हजार मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन आणि १० लाख व्हायल्स रेमडीसीवीरच्या या साहित्यासाठी ही जागतिक निविदा काढली आहे, अशी माहिती देखील टोपेंनी दिली आहे.
तर, राज्यात सध्या १६१५ मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणीत कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे. नंदूरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली असून ५० रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत असून अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवणेबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आतापर्यंत १०० पीएसए प्लांटसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत, असं देखील टोपे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत माझं दुसरं घर’; ऑक्सिजन खरेदीसाठी ब्रेट ली कडून भारताला ४३ लाखांची मदत !
- १ मे रोजी सर्वच राज्यात लसीकरण सुरू होईल, यावर प्रश्नचिन्ह – राजेश टोपे
- मोदीजी पाहा! बैठकीत मास्क न घातल्याने थायलंडच्या पंतप्रधानांना १४ हजारांचा दंड
- ‘कितीही संकटं आली तरी हा सह्याद्री झुकणार नाही’, मंत्री जयंत पाटील यांचा निर्धार
- राजकीय सुडबुद्धिने अनिल देशमुखांच्या घरावर धाड, मंत्री विश्वजीत कदमांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

