मुंबई:- मुंबईतील फेरीवाल्यांकडून शिवसेना कार्यकर्त्यांनी वसुली सुरू केल्याचा आरोप स्थानिक फेरीवाल्यांनी केला आहे. एवढेच नाही तर या फेरीवाल्यांना वसुलीची पावती देखील शिवसेनेकडून दिली जात आहे. या पावतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनील राऊत, नगरसेवक उपेंद्र सावंत यांचे फोटो आहेत. तुम्ही आम्हाला पैसे द्या, महानगरपालिका तुमच्या स्टॉलला हात लावणार नाही, पोलिसांना आम्ही मॅनेज करु, असे स्थानिक शिवसैनिकांकडून सांगण्यात येत असल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.
शिवसेनेच्या नेत्यांकडून रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून परस्पर पैसे घेतले जात असल्याच्या मुद्द्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी कडाडून टीका केली आहे. फेरीवाल्यांकडून पैसेवसुली करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याने अशाप्रकारचे कृत्य केले असते तर मी थेट कारवाई केली असती, असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते फेरीवाल्यांकडून कशाप्रकारे पैसे उकळतात, याचे पुरावे आज पत्रकार परिषदेत सादर केले. शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा केली होती मात्र हॉकर्स झोन झाले नाही. आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या

