मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवरच संशय घेत आरोप केले . तर, “मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,” असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केल्यानंतर आता तिला चांगलेच लक्ष्य केले जात आहे.
कंगनाच्या या वक्तव्यावर मराठी चित्रपटसृष्टीसह राज्यातील सामान्य नागरिक देखील संताप व्यक्त करत असून आता मनसेने देखील तंबी दिली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक ट्विट केले असून मुंबई पोलिसांवर करण्यात येत असलेले कोणतेही आरोप सहन केले जाणार नाहीत, तसेच ज्यांना असुरक्षित वाटत असेल त्यांनी आपापल्या राज्यात जाऊन राहावं, अशी धमकी वजा सल्ला देखील दिला आहे.
दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलासह घरातील आणखी एकाला कोरोनाची लागण
अमेय खोपकर यांनी, “माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही” असा फोटो ट्विट केला आहे.

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ ; कंगना रणौतच्या वक्तव्यावर रेणुका शहाणेंनी व्यक्त केला संताप!
दरम्यान, अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील तिचा खरपूस समाचार घेतला आहे. ” मुंबई असं शहर आहे, जिथं आपलं बॉलिवूड स्टार व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळं कुणीही आपल्याकडून या शहराप्रती आदर व्यक्त व्हावा, अशीच अपेक्षा व्यक्त करेन. तू पीओकेसोबत मुंबईची तुलना केलीस, हे भीतीदायक आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला,” असं ट्विटच शहाणेंनी कंगनाला टॅग करत केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

