जळगाव: ईडी लावली तर सीडी लावेन असे मी म्हणालो होतो. ते खरेच आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ती सीडी मी पोलिसांकडे दिलेली आहे. पोलिस चौकशी करत आहेत. चौकशीचा अहवाल आला की मी अहवाल जाहीर करणार आहे, असे म्हणत योग्य वेळी मी सीडी लावणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंची ईडीकडून सध्या चौकशी सुरु आहे. तसेच याप्रकरणी एकनाथ खडसे यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, ‘मी ईडी लावली तर मी सिडी लावेल, हे वक्तव्य केलं होतं त्यानुसार ही सिडी योग्य वेळी येईलच. गेल्या चाळीस वर्षांपासून मी राजकारणात आहे. या काळात माझ्यावर कोणताही आक्षेप आलेला नाही. मात्र सध्या जमिनी संदर्भात माझ्यावर लावण्यात आलेला आक्षेप हा हेतू पुरस्कार लावण्यात आलेला आहे. या व्यवहाराची संपूर्ण चौकशी झाली आहे. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. या प्रकरणात कोणतंही तथ्य नसल्याचा अहवाल एसिबीनं दिलेला आहे आणि तरीही ईडीची चौकशी सुरु आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत मी अनेक वेळा माझा दोष काय आहे? ते विचारलं आहे. आणि दोषी असेल तर फासावर लटकवा, असंही सांगितलं होतं. आता पुन्हा ईडीनं चौकशी लावली आहे’ असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.
दरम्यान, गेल्या वर्षी २३ ऑक्टोंबर २०२० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी ‘भाजपाने माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर ईडीने थेट कारवाई केली तरी खडसेंची सीडी बाहेर निघत नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, खडसेंनी पुन्हा एकदा सीडीची धमकी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य
- ओव्हल कसोटीतुन ‘हा’ भारतीय दिग्गज खेळाडू होणार संघाबाहेर
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर


